जळगाव, 24 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जळगावात उद्या 25 ऑगस्ट रोजी ‘लखपती दीदी’ महिला मेळावा होणार आहे. या मेळाव्याला केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान उपस्थित राहणार असून आज दुपारी त्यांचे जळगावात आगमन होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या उपस्थित होणाऱ्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नियोजनबद्द तयारी करण्यात येत आहे.
शिवराज सिंग चौहान लखपती दीदी महिला मेळाव्याला राहणार उपस्थित –
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज शनिवारी 24 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता भोपाळ विमानतळावरून जळगावकडे ते प्रयाण करणार आहेत. तसेच दुपारी 1.30 वाजता त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. आज रात्री त्यांचा जळगावला मुक्काम राहणार असून उद्या 25 रोजी ते ‘लखपती दीदी संमेलन’ कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यानंतर दुपारी 2 वाजता जळगाव विमानतळावरून ते भोपाळ कडे रवाना होणार आहेत.
जळगावात लखपती दीदी मेळावा –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘लखपती दीदी’ महिलांचा मेळावा जळगाव विमानतळ परिसरात आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, या ‘लखपती दीदी’ मेळाव्यासाठी देशभरातील 100 सखी जळगावात दाखल झाल्या आहेत. त्यातून दहा लखपती दीदींची निवड करण्यात आली असून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मेळाव्याच्या व्यासपीठावर प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी 1 लाखांहून अधिक महिला उपस्थित राहणार असल्याची माहितीही मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय.
हेही वाचा : भुसावळमधील भाविकांसोबत दुर्दैवी घटना, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल, Photos