ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा : ‘तुम्ही खेडोपाडी जाऊन भाजीपाला विकला, दूध विकले, कुटुंबाची गरज भागवण्यासाठी पोलीसची नोकरी स्विकारल्याचं सांगितलं. पण मागील 10-15 वर्षात असा कोणता चमत्कार झाला की, तुम्ही इतक्या कोटींचे मालक झालात, कुठून आला हा पैसा, तुमच्या कोणत्या फॅक्टरी सुरू होत्या, असा सवाल करत याचा खुलासा तुम्ही करावा असे आव्हान माजी आमदार दिलीप वाघ यांनी विद्यमान आमदार किशोर पाटील यांना दिले. आज पाचोरा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिले.
नेमकं काय म्हणाले माजी आमदार दिलीप वाघ –
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार दिलीप वाघ म्हणाले की, काल आमदारांनी माझ्या परवाच्या मेळाव्यावर पत्रकार परिषद घेतली. मी त्यांना धन्यवाद देतो की, मागील 10 वर्षात त्यांनी बापाचं नाव उच्चारलं नव्हतं. परंतु परवा जशी मी मेळाव्याला सुरुवात केली, तशी त्यांनी सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांना बापाचं नाव घ्यावसं वाटलं. कारण आतापर्यंत त्यांनी नावाचा वापर हा किशोर आप्पा म्हणून केला.
पुनर्वसन कशाला म्हणतात? –
भाऊंना कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक करुन मी त्यांचं पुनवर्सन केलं, असं आमदार किशोर पाटील म्हणाले होते. यावर माजी आमदार दिलीप वाघ म्हणाले की, माझा त्यांना प्रश्न आहे की, पुनर्वसन कशाला म्हणतात? मला तुम्ही राज्यसभा किंवा विधानपरिषदेवर निवडले नाही, राहिला प्रश्न प्रशासकपदाचा तर अजितदादा पवार यांच्या स्पष्ट सूचना त्यावेळचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना होत्या की, त्याठिकाणी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, यांना प्रशासकपद द्यावे. यानंतर माझ्या नेतृत्त्वाखाली त्याठिकाणी तिन्ही पक्षाचे प्रशासक त्याठिकाणी नेमले गेले. आमदार किशोर पाटील हे चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत असल्याचेही ते म्हणाले.
आजही रेकॉर्डवर कागदोपत्री कृष्णासागर हे नाव नाही –
बहुळा धरणाबाबत बोलताना दिलीप वाघ म्हणाले की, आजही रेकॉर्डवर कागदोपत्री कृष्णासागर हे नाव झालेलं नाही. बापूसाहेबांचा फोटोही तिथे दिसत नाही. त्या पाटीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मच्छीची दुकानं तिथं लागली आहे. त्या बाजूला ती पाटी मी नेहमी पाहतो. मराठा समाजाची मते मिळवण्यासाठी त्यांना हा केविलवाणा प्रयत्न केल्याची टीकाही वाघ यांनी केली. आमदार किशोर पाटील यांनी बहुळा धरणांवरुन केलेल्या त्यांनी उत्तर दिले.
याबाबत ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी ते आंदोलन होतं. बहुळा प्रकल्पाला आप्पासाहेबांनी कधीही विरोध केला नाही. किंबहुना 1995 मध्ये जेव्हा आमचे आप्पा निवडून आले तेव्हा बहुळाचे पूजन आप्पासाहेबांच्या हस्ते झाले. मंत्री महोदयांच्या हस्ते झाले. तेव्हापासून त्याठिकाणी पाणी अडवायला सुरुवात झाली. आप्पासाहेबांनी विरोध केल्याचा पुरावा त्यांनी समोर आणून दाखवावा, असे आव्हानही त्यांनी आमदार किशोर पाटील यांना दिले. तसेच त्याबाबत त्यांना अज्ञान आहे आणि त्यात भर काढावी किंवा माहिती घ्यावी, असा टोमणाही त्यांनी लगावला.
यांची दुकाने कधी बंद पडले, कधी उघडले, यांनी स्वत:चं सांगावं –
कुणीही कुणाच्या पुनर्वसनची भाषा व्यक्तीगत करू नये. जे काही पुनवर्सन करायचे असेल तर भडगाव पाचोरा मतदारसंघातील जनता मतदार ठरवतील. मला किशोर पाटील यांच्याकडे भीक मागायची गरज नाही. मला सरळसरळ जनतेला जे आशीर्वाद मी मागेल आणि त्यांच्याकडून माझं पुनर्वसन झालं तर ठीक आणि वाघ कुटुंबाला मागील 60 ते 70 वर्षांची परंपरा आहे, आम्हाला पुनर्वसनचा संबंध नाही. आम्ही काय लोकांच्या संपर्कात आहोत, सामाजिक कार्यात आहोत, सगळ्या गोष्टींत अग्रेसर आहोत, यांची दुकाने कधी बंद पडले, कधी उघडले, यांनी स्वत:चं सांगावं, या शब्दात त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर निशाणा साधला.
कोट्यवधींच्या संपत्तीचा खुलासा करावा –
पुढे बोलताना माजी आमदार दिलीप वाघ म्हणाले की, तुम्हीच तुमच्या भाषणातून उल्लेख केलेला आहे की, तुम्ही खेडोपाडी जाऊन भाजीपाला विकला, दूध विकले, कुटुंबाची गरज भागवण्यासाठी पोलीसची नोकरी स्विकारल्याचं सांगितलं. पण मागील 10-15 वर्षात असा कोणता चमत्कार झाला की, तुम्ही इतक्या कोटींचे मालक झालात, कुठून आला हा पैसा, तुमच्या कोणत्या फॅक्टरी सुरू होत्या, याचा खुलासा तुम्ही करावा, आव्हान माजी आमदार दिलीप वाघ यांनी विद्यमान आमदार किशोर पाटील यांना दिले. दरम्यान, या पत्रकार परिषदेला पीटीसीचे चेअरमन संजय वाघ, खलील देशमुख, आदी उपस्थित होते.