नागपूर, 11 सप्टेंबर : नागपुरातील सीर भारत (SEER BHARAT) फाऊंडेशच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या रिअल टाईम हेवी मेटल डिटेक्शन या डिव्हाईसला इंग्लंड सरकारच्या वतीने पेटंट मिळाले आहे. सीर भारत फाऊंडेशनचे सचिव शुभम धर्माले यांनी याबाबत माहिती दिली.
काय आहे हे यंत्र? –
रिअल टाईम हेवी मेटल डिटेक्शन हे यंत्र नागपुरातील सीर भारत (SEER BHARAT) फाऊंडेशच्या माध्यमातून विकसित करण्यात आले आहे. यूके सरकारच्या नोंदणीकृत डिझाईन्स कायदा 1949 या अंतर्गत हे पेटंट देण्यात आले आहे. हे यंत्र पाण्यातील जड धातूंचे प्रमाण शोधते आणि त्यामुळे त्यावर प्रकिया करुन पाणी शुद्ध करण्यास मदत होऊ शकते. कॅक्टस वनस्पती ज्याप्रकारे पाण्यातील जड धातू शोधून ते पाणी शुद्ध करते, त्याचपद्धतीने या यंत्राच्या माध्यमातून पाण्यातील जड धातूंचे प्रमाण शोधण्यास मदत होणार आहे.
आगामी काळात लवकरच हे यंत्राला मूर्त स्वरुप देऊन व्यावसायिकरणासाठी त्याचा जनहितासाठी वापर केला जाणार असल्याची माहिती सीर भारत फाऊंडेशनचे सचिव शुभम धर्माळे यांनी दिली.
हेही पाहा : Video : ओळख प्रशासनाची, प्रांताधिकारी पदाच्या जबाबदाऱ्या काय, त्यांचं कामकाज कसं चालतं?
हे यंत्र करण्यासाठी दर्शन रामभाऊजी तळहांडे (सहाय्यक प्राध्यापक, शरदचंद्र कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नायगाव बाजार, जि. नांदेड), डॉ. प्रेरणा ब्रह्मानंद थोरात (सहयोगी प्राध्यापिका, रसायनशास्त्र विभाग, तायवाडे महाविद्यालय, कोराडी, नागपूर), डॉ. सुवर्णा पुरुषोत्तम पाटील (विभागप्रमुख, वनस्पतीशास्त्र विभाग, तायवाडे महाविद्यालय, कोराडी, नागपूर), डॉ. सचिन केशवराव तिप्पट (विभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र विभाग, श्रीमती नरसिम्हा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अमरावती) या सर्वांनी यावर मेहनत घेत काम केले.
काय आहे सीर भारत संस्था –
सीर भारत संस्था ही नागपुरातील संस्था असून संस्थेच्या वतीने मागील काही काळापासून विविध आरोग्य शिबिरे, तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवले जात आहेत. इतकेच नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी कशा उपलब्ध होतील, यावरही विविध सेमिनारचे आयोजन करत सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. आगामी काळातही संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातील आणि शक्य तितके चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून आम्ही राष्ट्रविकासात योगदान देत राहू, अशी माहिती सीर भारत फाऊंडेशनचे सचिव शुभम धर्माळे यांनी दिली.
हेही पाहा : Jalgaon Police : चिमुकल्याला वाचविण्यासाठी पोलीस तरूणीने नदीत घेतली उडी, जळगावात नेमकं काय घडलं?