सोलापूर, 22 सप्टेंबर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या जात आहे. यामध्ये नेत्यांकडून वेळोवेळी आचरसंहितेची आठवण करून देत लवकरच महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकांसंदर्भात वक्तव्य केलंय.
काय म्हणाले अजित पवार? –
सोलपुरातील मोहोळमध्ये जनसन्मान यात्रेत बोलताना अजित पवार म्हणाले की, पुढील 15 दिवसांत आचारसंहिता लागेल आणि त्याच्यानंतर निवडणूक. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनी कामाला लागावे. सोलापूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त महायुतीचे आमदार निवडून आले पाहिजेत. मी माढ्यातही तेच सांगणार आहे, असे म्हणत मोहोळकरांना राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून देण्याचे आवाहन अजित पवारांनी केलंय.
महायुती सरकारच्या योजनांचा प्रचार –
अजित पवार यांनी आतापर्यंत जनसन्मान यात्रेत राज्यातील जनतेसोबत संवाद साधत महायुतीच्या सरकारच्या योजनांचा दाखला दिलाय. तसेच महिला, तरूण, युवक तसेच शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांवर देखील भर देत महायुतीला साथ देण्याचेही आवाहन अजित पवारांकडून केलं जात आहे.
अजित पवार यांची जनसन्मान यात्रा –
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आता विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 8 ऑगस्टपासून राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ अशा 39 विधानसभा मतदार संघांत पक्षाचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला. आता ही यात्रा कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात दाखल झालीय.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत