धुळे, 27 सप्टेंबर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दरम्यान, आज सकाळी 11 च्या सुमारास वयाच्या 89 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आमदार कृणाल पाटील आणि विनय पाटील ही दोन मुले तसेच मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन –
रोहिदास पाटील यांची प्रकृती मागील काही महिन्यांपासून खालावत होती. काही महिन्यांपूर्वी, त्यांना कोल्हापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांची फुफ्फुसे कमी क्षमतेने काम करत असल्याचे निदान झाले होते. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. परंतु, अलीकडच्या काळात त्यांच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड झाल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली. दरम्यान, अखेर आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रोहिदास पाटील यांनी काँग्रेसच्या काळात विविध खात्यांचं मंत्रीपद भुषवलं होतं. ते काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील यांचे वडील आहेत. उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशी रोहिदास पाटील यांची ओळख होती. अक्कलपाडा धरण बांधण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. धुळे जिल्ह्यात अनेक शैक्षणिक संस्था काढून गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा त्यांनी उपलब्ध करुन देण्याचे काम देखील त्यांनी केलं होतं.
उद्या होणार अंत्यसंस्कार –
दिवंगत रोहिदास पाटील यांच्यावर उद्या सकाळी धुळ्यातील एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालयाच्या प्रांगणात रोहिदास पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तत्पूर्वी नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर येथील सुंदर सावित्री सभागृहात त्यांचे पार्थिव सकाळी 7 ते 10 वाजेदरम्यान अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अंत्यविधीला काँग्रेसचे अनेक नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview