जळगाव, 12 एप्रिल : जळगाव जिल्ह्यात अलीकडेच लाचखोरीच्या वेगवेगळी प्रकरण घडली असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय अर्ध सैनिक बलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या जवानाकडे एका प्रकरणांसदर्भात लाच मागितली. यावरून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्यावर जळगाव एसीबीने मोठी कारवाई केली आहे. रविंद्र प्रभाकर सोनार (वय 47) आणि धनराज निकुंभ असे त्या पोलिसांचे नाव असून ते दोघंही जळगाव शहर पोलिस ठाण्यात पोलीस हवालदार या पदावर कार्यरत होते.
नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे केंद्रीय अर्ध सैनिक बलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. त्यांचे व त्यांची पत्नी यांचे कौटुंबिक कारणावरून भांडण झाले होते. त्याबाबत त्यांच्या पत्नीने तक्रारदार यांच्याविरोधात दिलेल्या तक्रारीनुसार 4 फेब्रुवारी 2025 रोजी जळगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, लाचप्रकरणातील आरोपी रविंद्र सोनार यांनी तक्रारदार यांना फोन करून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते. यावेळी तक्रारदाराने धनराज निकुंभ याची भेट घेतली.
दरम्यान, या जवानाकडे निकुंभ याने गुन्ह्याचे तपासकामी अटक न करण्यासाठी, योग्य ती मदत करण्यासाठी तसेच त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल न पाठवण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली होती. यानंतर निकुंभ याने तक्रारदाराकडे पैशांची मागणी करत तगादा लावल्याने त्या तक्रारादाराने काल 11 एप्रिल रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली.
20 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई –
यानुसार, जळगाव एसीबीने पडताळणी कारवाईदरम्यान धनराज निकुंभ याने तक्रारदार यांना 50 हजार रुपयेची लाच मागणी करून तडजोडीअंती 20 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. यानुसार सापळा कार्यवाही दरम्यान रवींद्र सोनार याने लाच रक्कम 20,000/- रुपये पंचासमक्ष स्वतः स्वीकारली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात जळगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई –
जळगाव एसीबीचे पोलीस उपधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे,पोउपनिरी सुरेश पाटील चालक, पोहेकॉ रविंद्र घुगे, पोहेकॉ जनार्दन चौधरी चालक, पोहेकॉ सुनिल वानखेडे, पोना/ बाळू मराठे, पो. कॉ/राकेश दुसाने, आदींनी सापळा रचत ही कारवाई केली.
हेही वाचा : Breaking! जळगाव जिल्ह्यातील ‘या’ पाच रेल्वे स्थानकांचा कायापालट; 147 कोटींचा निधी मंजूर