शिरपूर : गेल्या काही दिवसात लाचखोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यात सलग दोन दिवशी लाचखोरीच्या घटना समोर आल्या होत्या. यातच आता आणखी एक लाचखोरीची घटना समोर आली आहे. वीज कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला 400 रुपयाची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. एका खांबावरुन दुसऱ्यावर वायर जोडून देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी वरिष्ठ तंत्रज्ञाला अटक करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
जितेंद्र वसंत धोबी (वय 33) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर तंत्रज्ञाचे नाव आहे. ते शिरपूर येथील महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना वीज कनेक्शनची वायर एका खांबावरुन दुसऱ्या खांबावर जोडून देण्यासाठी ग्राहकाकडून 400 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. धुळे लाचलुचपत विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी शिरपूर येथील एका व्यक्तीने तक्रार केली होती. तक्रारदार यांचे मौजे वरवाडे शिरपुर येथे घराचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी तक्रारदार यांच्या घराच्या वीज पुरवठ्यासंदर्भात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे वीज कनेक्शनची वायर एका विजेच्या खांबावरुन दुसऱ्या खांबावरुन जोडून मिळावी यासाठी तक्रारदार यांनी वीज कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात जाऊन वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र धोबी यांची भेट घेत त्यांना त्यांच्या वीज पुरवठयाची वायर दुसऱ्या खांब्यावरुन जोडुन देण्याची विनंती केली.
यावेळी जितेंद्र धोबी यांनी वायर दुसऱ्या खांब्यावरुन जोडुन देण्याच्या मोबदल्यात 500 रुपये लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार या संबंधित व्यक्तीने बुधवारी 8 रोजी दुरध्वनीव्दारे धुळ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयास दुरध्वनीवरुन तक्रार केली.
यानंतर धुळ्याच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने 9 रोजी शिरपुरला जाऊन तकारदार यांची तक्रार नोंदवून सदर तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र धोबी यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती 400/-रुपये लाचेची मागणी केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी 10 रोजी शिरपूर येथील वीज कंपनीच्या कार्यालयात सापळा रचला. याठिकाणी तक्रारदार यांच्याकडून 400 रुपयांची लाच घेतांना वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र वसंती धोबी यांना रंगेहात पकडण्यात आले.
या पथकाने केली कारवाई –
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, मकरंद पाटील, प्रविण पाटील, रामदासा बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.