काटोल (नागपूर), 15 फेब्रुवारी : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कचारीसावंगा येथील आदर्श विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी डॉजबॉल स्पर्धेत आपला डंका कायम ठेवला आहे. अंडर-19 मुलींच्या स्पर्धेत आदर्श विद्यालयाने राज्यातून प्रथम बक्षीस पटकावले आहे.
दरम्यान, राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर सर्व टीमची गावकऱ्यांनी जल्लोषात मिरवणूक काढली. तसेच गावातील बाजार चौकात खेळाडूंचा आणि क्रिडा प्रशिक्षकांचा सत्कारदेखील करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शिक्षण व क्रिडा संचालनालय, पुणे यांच्यावतीने सातारा जिल्ह्यात नुकत्याच डॉजबॉल स्पर्धा पार पडल्या. विभागीय स्पर्धा पार करत आदर्श विद्यालयातील खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश केला. यात पहिल्या राऊंडमध्ये पुणे विभागाचा 5-1 ने पराभव करत लातूर संघासोबत सेमी फायनल लढत झाली. सेमीफायनलमध्ये लातूरला धुळ चारत कोल्हापूर संघासोबत अंतिम लढत झाली.
हेही वाचा – अल्पभूधारक शेतकऱ्याची कमाल, नव्या कृषीपद्धतींचा वापर अन् मिरची पिकातून मिळवला हजारोंचा नफा
यात आदर्श विद्यालयाचा संघ 4-2 ने जिंकला. डॉजबॉल संघात पूजा मापले, हर्षदा मारबते, साक्षी मारबते, जानवी दुबे, समिक्षा मारबते, स्नेहा भागवतकर, यशश्री टेंभे, साक्षी सलाम, मोहिनी भलावी, मिनाक्षी कुंडलकर या खेळाडूंचा सहभाग होता. तर क्रिडा प्रशिक्षक अमोल बाभुळकर यांचे मार्गदर्शन होते. विशेष म्हणजे मे महिन्यात होणाऱ्या डॉजबॉल प्रिमियम लिगसाठी तीन मुलींची निवड देखील झाली आहे.
या विजयाचा जल्लोष गावकऱ्यांच्या वतीने फटाके फोटून अन् वाजत गाजत मिरवणूक काढत करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती संजय डांगोरे, सरपंच रवी जयस्वाल, आदर्श विद्यालय संस्थेचे सचिव शिवदयाल दुबे, प्राचार्य मुकेश दुबे, नानाजी माळवी तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.