यावल (जळगाव), 11 जुलै : मागच्या आठवड्यात म्हणजे 4 जुलै रोजी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात गोळीबाराच्या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना घडल्यानंतर जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच आता जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिअर दिली नाही म्हणून एकाने गोळीबार केला. या घटनेत हॉटेलमालक गंभीर जखमी झाले आहेत.
काय आहे संपूर्ण घटना :
जळगावच्या यावल तालुक्यातील चिंचोली या गावाजवळ आडगाव फाट्याजवळ गोळीबाराची ही घटना घडली. या फाट्याजवळ हॉटेल रायबा आहे. या घटनेत हॉटेल रायबाचे मालक प्रमोद बाविस्कर (वय ४६) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये हॉटेल मालक प्रमोद बाविस्कर यांच्या छातीत आणि हातावर गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचाराकरिता जळगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
या घटनेबाबत एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आम्ही हॉटेल बंद केली आणि गाडीत बसलो. यावेळी एक अनोळखी व्यक्ती आला आणि त्याला बिअर हवी आहे, असे त्याने सांगितले. मात्र, हॉटेल बंद झाली असून बिअर उपलब्ध नाही. येथून एक-दीड किलोमीटर अंतरावर किनगाव गाव आहे, तेथे तुम्हाला बिअर मिळेल. तेथून तुम्ही घेऊ शकता, असे त्याला सांगण्यात आले. यानंतर आम्ही वाहनातच बसलो होतो. मात्र, यावेळी त्या व्यक्तीने आमच्यावर गोळीबार केला. या मध्ये प्रमोद बाविस्कर यांना गोळी लागली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. एकूण दोन जण होते. यामध्ये पांढरा शर्ट घातलेला एक व्यक्ती हा दूर उभा होता आणि ज्याने गोळीबार केला त्याने त्याने काळा टी-शर्ट घातला होता. हे दोन्ही दुचाकीवर आले होते.
दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत यावल पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाईला सुरुवात केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र, जळगाव जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीबाबत आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून गोळीबारासारख्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : Video | Special Report | पाचोरा गोळीबार प्रकरण | तरूणाचा जागीच मृत्यू; आरोपींनी कबुलीही दिली