मुंबई, 23 सप्टेंबर : महाराष्ट्रातील मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला असून, त्यांच्या पिकांसह घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर शेतजमिनीसोबत मातीही वाहून गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नेमकी कोणती मदत मिळणार? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता.
दरम्यान, सगळीकडे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई उपलब्ध करून दिली जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.
कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा –
मुंबईतील मंत्रालयात माध्यमांसोबत बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, अतिवृष्टीचा मोठा फटका राज्याला बसला आहे. सुरुवातीला विदर्भ, त्यानंतर मराठवाडा आणि मग जवळपास संपूर्ण महाराष्ट्रावर या पावसाचा परिणाम झाला. शेतकऱ्यांच्या तब्बल 70 लाख एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. काही भागात जमीन वरील मातीसह घरांचेही नुकसान झाले. या सर्व नुकसानीसंदर्भात पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळेल –
राज्यातील सर्वत्र पंचनाम्यांचे काम वेगाने सुरू आहे. शेतकरी भावंडांनी धीर धरण्याची गरज आहे. हे नैसर्गिक संकट असले तरी सरकार त्यांच्या सोबत ठामपणे उभे आहे. ज्या ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले आहेत, त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळेल, असे आश्वासनही कृषीमंत्री भरणे यांनी दिले आहे.