मुंबई, 20 जुलै : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच विरोधकांच्या निशाणावर राहिलेले आहेत. दरम्यान, आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’वर कृषीमंत्री विधान परिषदेच्या सभागृहात जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला. यावरून मंत्री कोकाटे यांच्यावर पुन्हा टीकेची झोड उठली आहे. अशातच त्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओवर स्पष्ठीकरण दिलंय.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया –
रोहित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या व्हिडिओबाबत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना याबाबत विचारणा करण्यात आली. त्याबाबत ते म्हणाले की, मी वरिष्ठ सभागृहात बसलो होतो. कनिष्ठ सभागृहात काय चाललं आहे, हे पाहण्यासाठी मी यूट्यूबवर लाईव्ह पाहत होतो. त्यावेळी अचानक जाहिरात सुरू झाली. ती स्कीप करताना दोन-तीन सेकंद लागले. दरम्यान, “तुम्हाला कधी तशी ‘जंगली रमी’ची जाहिरात येत नाही का?”, असा उलट सवालही कृषीमंत्र्यांनी यावेळी केला.
View this post on Instagram
माझं काम पूर्णपणे पारदर्शक –
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुढे म्हणाले की, मी कनिष्ठ सभागृहातील कार्यवाही पाहत होतो आणि त्यावेळी यूट्यूबवर जाहिरात आली. ती स्कीप करताना दोन-तीन सेकंद लागले आणि यामध्ये लपवण्यासारखं काहीच नाही. यामुळे मी काही पाप केलं नाही. दरम्यान, माझं काम पूर्णपणे पारदर्शक आहे. अशा पद्धतीने गेम खेळण्याचे काही कारणच नसल्याचे माणिकराव कोकाटे म्हणाले.
विरोधकांकडून मला टार्गेट केलं जातंय –
दरम्यान, मी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामावर कोणी बोलत नाही, पण एक छोटा जाहिरातीचा क्षण दाखवून मला लक्ष्य केलं जात आहे. परंतु, माझ्या लक्षातही आलं नव्हतं. दुसऱ्या सेकंदाला मी ती जाहिरात स्कीप केली, पण केवळ तेच काही सेकंद दाखवून मला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप आरोपही कोकाटे यांनी विरोधकांवर केला आहे.