पुणे, 10 एप्रिल : आम्ही कालही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. परंतु, देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारखा मजबूत नेता मिळाल्याने त्यांच्या पाठीशी उभे राहून जगामध्ये आपल्या देशाचा मानसन्मान वाढविण्याकरिता तसेच देशाची प्रगती करून घेण्यासाठी त्यांना आपण पाठबळ देणं गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही तो निर्णय घेतला, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाली असून त्यांचा नागरी सत्कार पिंपरीमध्ये आयोजित केला होता. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
तळ्यात मळ्यात करू नका –
राष्ट्रवादीत शरद पवार गट आणि अजित दादा गट असे दोन गट पडल्यानंतर अजूनही अनेकांना वाटतं की नेमकं कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यावा. यावरून अजित पवारांना पुन्हा एकदा निशाणा साधलाय. ते म्हणाले की, तळ्यात मळ्यात करू नका. तुम्ही एकाच मतावर ठाम राहा. तळ्यात मळ्यात करत राहिला तर तुम्हाला कोणी विचारत घेत नाही आणि पदही देत नाही. तसेच एकाच मतावर ठाम राहिला तर अण्णा बनसोडे यांच्यासारखे पद मिळेल.
विकसित भारतासाठी महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल –
अजित पवार पुढे म्हणाले की, आम्ही शब्दाचे पक्के आहोत. भगिनींसाठी, माय-माऊलींसाठी सुरू केलेली योजना बंद पडणार नाही. आम्हाला सर्व समाज घटकाला सोबत घेऊन पुढे चालायचं आहे. दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक, गोरगरीब कुटुंबातील मुलांसाठी मोफत शिक्षण, महिला वर्ग आदींसाठी वेगवेगळ्या योजना केंद्र व राज्य सरकारकडून राबवल्या जात आहेत. 2047 सालापर्यंत विकसित भारत घडवण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य महत्त्वाची भूमिका बजावेल, याकरता आपण प्रयत्नशील आहोत. देशभरातून जेवढा जीएसटी गोळा होतो, त्यापैकी 16 टक्के जीएसटी हा एकटा महाराष्ट्र गोळा करतो. विकासाच्या दृष्टिकोनातून जागतिक पातळीवर देशाचं नाव पुढे घेऊन जाण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न महाराष्ट्र करत आहे.