अक्कलकुवा (नंदुरबार), 16 मार्च : भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याला आता 75 वर्ष झाली आहे. मात्र, या कालावधीमध्ये काही गावं अशीही आहेत, जिथे अजूनही बस सेवा पोहोचली नव्हती. त्यातील एक गाव म्हणजे नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील होराफळी हे गाव. या गावात स्वातंत्र्याच्या तब्बल 75 वर्षांनी सार्वजनिक बससेवा सुरू करण्यात आली आहे.
विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील होराफळी येथे एस. टी. बससेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. यावेळी आमदार आमश्या पाडवी यांच्यासोबत इतर अधिकारी, बस चालक, वाहक आणि होराफळी गावातील नागरिक आदी उपस्थित होते.
काय म्हणाले आमदार आमशा पाडवी –
बससेवा सुरू झाल्यामुळे गावातील नागरिकांना, त्याचबरोबर कॉलेज, शाळेमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा येथे जायला मदत होणार होणार आहे. नागरिकांनी तसेच सर्वांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार आमश्या पाडवी यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, मला गावातील लोकांनी वारंवार सांगितलं की, आमच्याकडेही बस सुरू करा. यासंबंधीचा अर्ज करत नागरिकांनी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. नागरिकांची ही मागणी आता पूर्ण झाली आहे. दरम्यान, बससेवा सुरू झाल्यामुळे गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करत आमदार आमश्या पाडवी यांचे अभिनंदन केले.