ठाणे, 24 सप्टेंबर : बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदे याचं पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आलंय. यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. यामध्ये स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केलाय. तर दुसरीकडे या एन्काऊंटरवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे गंभीरित्या जखमी झाले. सध्यास्थितीत त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप केले जात आहेत.
नेमकं काय घडलं? –
बदलपूर बालिका अत्याचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी अक्षय शिंदेच्या दुसऱ्या पत्नीने तक्रारी दिली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अक्षयविरोधात अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडून त्याला ताब्यात घेतले होते. पोलीस काल सायंकाळी त्याला तळोजा कार्यालयातून घेऊन जात असताना, त्याने मुंब्रा बाह्यवळणाजवळ पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेतली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. तेव्हा स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय ठार झाला. यानंतर अक्षयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आलाय. शवविच्छेदनानंतर अक्षयचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपविण्यात येणार आहे.
हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview
ठाणे पोलिसांनी दिली घटनेची माहिती –
अक्षय शिंदेच्या मृत्यूनंततर ठाणे पोलिसांनी पत्रक जारी केले. या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, आरोपी अक्षय शिंदेच्या दुसऱ्या पत्नीने तक्रारीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडून त्याला ताब्यात तळोजा कारागृहात ताब्यात घेण्यात आले. काल सायंकाळी सुमारे 05.30 वा. आरोपी अक्षय शिंदे त्यास घेवून ठाणे येथे येत असताना सुमारे 06.00 वा. ते 6.15 वा. चे दरम्यान पोलीस वाहन मुंब्रा बायपास येथे आले असता, सदर आरोपी अक्षय अण्णा शिंदे याने पथकातील पोलीस अधिकारी सपोनि/निलेश मोरे यांच्या कमरेचे सर्व्हिस पिस्तुल खेचून घेतले व पोलीस पथकाच्या दिशेने 03 राऊंड फायर केले. त्यापैकी 01 राऊंड सपोनि/निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला व 02 राऊंड इतरत्र फायर झाले.
स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने 01 गोळी फायर केली असता आरोपी अक्षय अण्णा शिंदे यास लागून तो जखमी झाला. यानंतर त्याला पुढील उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात आणले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. तसेच डॉक्टरांनी तपासून सपोनि/निलेश मोरे व इतर पोलीस यांना पुढील उपचारकामी ज्युपिटर हॉस्पीटल येथे हलविण्यास सांगितले. सध्यास्थितीत सपोनि/निलेश मोरे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पालकांनी नेमका आरोप काय केलाय ? –
बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरात मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांवर मोठा आरोप केलाय. अक्षयच्या आईने म्हटलंय की, माझ्या पोराला कुणीतरी चिठ्ठी लिहून दिली होती. ती त्याच्या खिशात होती आणि ती चिठ्ठी तो मला दाखवत होता, पण मला काही दिसले नाही. तिथल्याच मुलांनी मला ही चिठ्ठी दिल्याचे त्याने मला सांगितले. त्याला वाचता येत नाही आणि तो शिकलेला नाही त्यामुळे त्या चिठ्ठीत काय लिहिलं होते त्याला माहिती नाही.
तीनवेळा आम्ही त्याला भेटलो. त्याने मला सांगितले की मी काहीही केलेले नाही. तळोजा जेलमघ्ये पोलिसांनी मला खूप मारले, असे अक्षयने सांगितले. माझ्या मुलाला फटाके देखील फोडता येत नाही. मात्र, पैसे देऊन त्याला मारलंय, असा आरोप अक्षयच्या आईने केला आहे. दरम्यान, अक्षयच्या आईने केलेल्या आरोपांमुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणावर माहिती देताना सांगितले की, पोलीस तळोजा तुरुंगातून घेऊन जात अक्षय शिंदेनी पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला असता त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणावर माहिती देताना सांगितले की, अक्षय शिंदेच्या पूर्वपत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. त्यासंदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन पोलीस त्याला नेत होते. त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने पोलिसांवर आणि हवेत गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणार्थ गोळी चालवलेली आहे. दरम्यान, अक्षय शिंदेला दवाखान्यात नेण्यात आलं आणि यामध्ये या आरोपीचा मृत्यू झाला आहे.
विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल –
अक्षय शिंदे एन्काऊंटरच्या या प्रकरणावर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहिजे होती. परंतु, या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही, यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणे अपेक्षित असल्याचे शरद पवार यांनी म्हटलंय. तसेच आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट केले जात असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केलाय. दरम्यान, महाविकास आघाडीतील नेत्यांनी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर राज्य सरकारवर आरोप केले आहेत.
बदलापूर प्रकरणात एसआयटीकडून सुरू होता तपास –
बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने राज्यभर संताप व्यक्त केला जात होता. या घटनेनंतर संतप्त झालेल्या बदलापूरवासीयांनी रेल्वे मार्गावर उतरून आंदोलन केले होते. यावेळी तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर, अक्षयला अटक करण्यात आली आणि नागरिकांच्या संतापाची दखल घेत राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. एसआयटीने तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र देखील दाखल केले होते.
हेही वाचा : Big News : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर? नेमकं काय घडलं?