पुणे – सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मोठा प्रतिसाद मिळत असून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणाऱ्या या संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरून माय मराठीचा जागर सुरू आहे. या संमेलनासाठी दिल्लीला येणाऱ्या महाराष्ट्रातील साहित्य रसिकांसाठी एका विशेष रेल्वेची संस्थेने मागणी केली होती. पुण्याचे केंद्रीय मंत्री व संमेलनाचे सरकार्यवाहक मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नाने ही रेल्वे रेल्वेमंत्रालयाने मंजूर केली आहे.
महाकुंभ आणि इतर अडचणी असतानाही या संमेलनासाठी मंत्रालयाने ही रेल्वे मंजूर केली आहे. 17 डबे असलेली ही रेल्वे पुर्णपणे स्लीपर क्लास आहे. ही विशेष रेल्वे 19 फेब्रुवारी 2025 रोजी पुण्यातून निघेल आणि दि. 20 फेब्रुवारी रोजी दिल्लीत पोहोचेल. परतीचा प्रवास 23 फेब्रुवारी रोजी रात्री सुरू होईल. 24 तारखेला पुण्यात पोहोचेल.
ही विशेष रेल्वे असल्याने यासाठी भरावी लागणारी रक्कम सामान्य टिकिटाच्या तीन पट आहे. यामध्ये सवलत देण्याबाबत माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे आग्रही आहे. त्यामूळे काही सवलत मिळण्याची शक्यता आहे. मात्र, रेल्वे मंत्रालयाने कुठल्याही प्रकारची सवलत कोणालाही न देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतल्याने ही सवलत न मिळाल्यास दिल्लीला येणाऱ्या साहित्य रसिकांची अडचण होऊ नये यासाठी 1500 रूपये भरून रेल्वे प्रवासासाठी नोंदणी करण्याचा निर्णय संयोजन संस्था व महामंडळाने घेतला आहे.
या शिवाय ज्यादा येणारी ही रक्कम मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रायोजकाद्वारे अथवा हितचिंतकांकडून देणगीद्वारे जमा करण्याचे प्रयत्न आहेत. या परिस्थितीत रेल्वे अंतिम मान्यतेचे पत्र आल्यावर तातडीने एकूण रक्कम भरण्याचा निर्णय संयोजक संस्थेने घेतला आहे. ही नोंदणी सरहद पुणे कार्यालय, सर्वे नं 6 धनकवडी, पुणे 43, साहित्य परिषद पुणे कार्यालय टिळक रोड पुणे 30 येथे करता येईल.
ज्यांना हे शक्य नाही त्यांनी दुरध्वनी क्र. 7398989856/ 8484055252 यावर नोंदणी करावी. तसेच नोंदणीसाठी https://forms.gle/wnVzQYqauHUwwsY79 तसेच क्यु आर कोड स्कॅन करून नोंद करावे असे आवाहन संस्थेचे संजय नहार, समन्वयक डॉ. शैलेश पगारिया आणि मसापचे मिलींद जोशी तसेच सुनीता राजे पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.