महेश पाटील, प्रतिनिधी
भडगाव – जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातून एक दु:खद घटना समोर आली आहे. भडगाव तालुक्यातील आणि सध्या भारतीय सैन्यदलात सेवेत असणाऱ्या जवानाला कर्तव्यावर असताना वीरमरण आले. शरद धोंडू बाविस्कर असे या जवानाचे नाव आहे. ते भडगाव तालुक्यातील निंभोरा या गावातील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद धोंडू बाविस्कर हे महार रेजिमेंटमध्ये सध्या मणिपूर येथे कार्यरत होते. या दरम्यान, काल त्यांना कर्तव्यावर असताना गोळी लागून वीरमरण आले. मागील 16 ते 17 वर्षांपासून ते भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. तसेच मागच्याच महिन्यात 14 तारखेला ते आपली सुट्टी संपवून परत सेवेत रुजू झाले होते. येत्या जानेवारी महिन्यात ते सैन्यदलात निवृत्त होणार होते. मात्र, त्याआधीच त्यांना वीरमरण आले.
सोमवारी होणार अंत्यसंस्कार –
दरम्यान, जवान शरद बाविस्कर त्यांचे पार्थिव हे उद्या रविवारी मणिपूर येथून विमानाने दिल्लीमार्गे छत्रपती संभाजीनगर येथे येणार असून त्यानंतर सोमवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान, त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. वीर जवान शरद धोंडू बाविस्कर यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा-मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. शरद धोंडू बाविस्कर हे अत्यंत समजदार असे व्यक्तिमत्त्व होते, असे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या या वीरमरण आल्याच्या बातमीनंतर परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
हेही पाहा – पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ : कोण होणार आमदार?, भडगाव शहरातील थेट जनतेशी संवाद…