यावल, 29 एप्रिल : यावल तालुक्यातील मनवेल येथे सात वर्षीय बालक केशव बारेला तर डांबुर्णी येथे दोन वर्षीय बालिकेचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाला होता. गेल्या दोन महिन्यातील बिबट्याच्या हल्ल्याचा या दोन घटना घडल्या होत्या. दरम्यान, आता या दोन्ही मृत बालकांच्या कुटुंबियांना शासनाने प्रत्येकी 25 लाख रूपये अशी एकूण 50 लाख रूपयांची मदत दिली आहे. याबाबतचा धनादेश आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी कुटंबियांना सुपूर्द केला आहे.
मनवेलमध्ये बिबट्याने सात वर्षीय बालकावर चढवला होता हल्ला –
यावल तालुक्यातील मनवेलमधील साकळी गावाजवळच्या मानकी शिवारात 6 मार्च रोजी सात वर्षीय बालक हा त्याच्या आईसोबत जात असताना अचानक हल्ला करत बिबट्याने मुलाला आईच्या हातातून खेचून नेले. दरम्यान, या हल्ल्या केशा बारेलाचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी चोपडा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा उपस्थित करत केशा बारेलाच्या कुटुंबियांना मदत जाहीर करण्याची मागणी सरकारकडे केली होती.
डांबुर्णीत दोन वर्षीय बालिकेचा झाला होता मृत्यू –
यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील शेत शिवारात गट क्र. 741 मध्ये मेंढपाळांचे तीन कुटुंब वास्तव्यात असताना 17 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने या कुटुंबातील रत्नाबाई ही दोन वर्षाच्या चिमुकली आपली आई जिजाबाई रूपनर हिच्यासोबत झोपलेली असतांना तिच्यावर झडप घालत तिला ठार केले होते. यावल तालुक्यातील गेल्या मार्च आणि एप्रिल महिन्यातील बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना होती.
दोघांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाखांची मदत –
यावल तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामुळे किनगाव आणि डांभुर्णी शिवारात मयत झालेल्या बालकांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे मदत मिळावी, यासाठी चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे वेळोवेळी शासनाकडे पाठपुराव केल्याने आता मयत मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाखांची अशी एकून 50 लाखांची मदत जाहीर करण्यात आली.
दरम्यान, यावलच्या पंचायत समितीत सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित बैठकीत आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाखांच्या मदतीचा चेक देण्यात आला. यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, वनविभागाची कर्मचारी, कर्मचारी, आदी उपस्थित होते.