मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा,16 फेब्रुवारी : सातपुड्यातील डोंगर दऱ्यात महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर उमर्टी हे गाव असून एक गाव महाराष्ट्र हद्दीत तर दुसरे गाव मध्यप्रदेश हद्दीत आहे. या दोन्ही गावांत अवैध बंदूक, गावठी कट्टे बनविण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. आणि याठिकाणाहून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात गावठी कट्ट्यांची तस्करी केली जात असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अवैधपणे गावठी कट्ट आढळून आल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काल शनिवार 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी उमर्टीत हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय? –
चोपड्या तालुक्यानजीक महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या उमर्टी गावात गावठी कट्टे बनिवले जातात. असे असताना गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधण्यासाठी उमर्टीत पोलीस गेले असता त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी चोपडा ग्रामीणच्या शशिकांत पारधी या पोलीस कर्मचाऱ्याला बांधून ठेवत मध्यप्रदेश हद्दीत नेले.
मिळालेल्या माहितीनुसार, गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधण्यासाठी गेला असता पोलिसांवर हल्ला करण्यात आला. यावेळी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे नाईक शशिकांत पारधी यांना मध्यप्रदेशातील हद्दीत डांबून ठेवले होते. दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्याला सुखरूपपणे परत आणण्यास पोलिसांना यश आलंय. या मारहाणीत सपोनि शेषराव नितनवरे, पोलीस शिपाई किरण पारधी व होमगार्ड विश्वास भिल हे जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास रूग्णालायत दाखल करण्यात आले.
गुन्हे दाखल अन् एकास अटक –
जळगाव जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख डॉ. महेश्वर रेड्डी आणि त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांनी उमर्टीत भेट देत पोलिसांना आवश्यक त्या सूचना केल्या. दरम्यान, उमर्टीतील पोलिसांवर झालेल्या हल्ला प्रकरणात पप्पूसिंग उर्फ नरेंद्रसिंग प्रितमसिंग बर्नाला, राजेंद्रसिंग प्रितमसिंग बर्नाला, सुरेंद्रसिंग प्रितमसिंग बर्नाला, गुरदेवसिंग लिवरसिंग बडोल, बादलसिंग उर्फ धरमसिंग दिलदारसिंग बर्नाला व इतर सर्व. रा. पारउमर्टी ता.वरला जि. बडवाणी (म.प्र.) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पप्पूसिंग बर्नाला याला अटक करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत