धरणगाव (जळगाव), 22 मार्च : आज राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील धरणगावात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ठाकरे गट यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते कृषीमंत्र्यांचा ताफा अडवत असल्याचे पाहून पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतलं.
दरम्यान, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कृषीमंत्र्यांचा ताफा पाहून रिकामे खोके तसेच कापूस फेकत निषेध व्यक्त केला. तसेच पन्नास खोके, एकदम ओके, कृषिमंत्र्यांचा निषेध असो, शिंदे सरकारचा निषेध असो, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
शेतकऱ्यांशी संवाद साधला नाही –
दरम्यान, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी नुकसानीच्या पाहणी अवघ्या दहा मिनिटात आटोपली. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील शेत शिवारात मका पिकाचं झालेलं नुकसान दहा मिनिटात पाहून कृषी मंत्री बांधावरून निघाले. या पाहणीप्रसंगी कृषीमंत्री सत्तार यांनी कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र, शेतकऱ्यांशी कोणत्याही स्वरूपाचा संवाद साधला नाही. तसेच शेतकऱ्यांची चर्चाही केली नाही. तसेच या पाहणीप्रसंगी कृषीमंत्र्यांनी कापूस प्रश्नावरही बोलणं टाळलं.