एरंडोल, 20 मार्च : राज्य सरकारकडून लवकरच नवे वाळू धोरण लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना बांधकामासाठी वाळू सहज उपलब्ध होईल. असे असले तरी जिल्ह्यात वाळू तस्करीचे प्रमाण वाढले असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. वाळू तस्करी प्रकरणी तलाठ्यावर ट्रॅक्टर घालण्याचा एकाने प्रयत्न केला. यामध्ये तलाठी नितीन पाटील जखमी झाल्याचे समजते. ही घटना एरंडोल तालुक्यात आज 20 मार्च रोजी घडली असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील कढोली येथे नितीन पाटील मागील तीन वर्षांपासून तलाठी म्हणून कार्यरत आहेत. तहसिलदार तसेच मंडळ अधिकाऱ्यांचे कांताई बंधारा या भागात गौणखनिज विरोधात कारवाई करण्याचे आदेश तलाठ्यांना प्राप्त झाले होते. दरम्यान, रवंजा खेडी फाट्यादरम्यान अवैध वाळू वाहतूकीचा ट्रॅक्टर आढळून आला आले. याविरोधात सदर ट्रॅक्टर एरंडोल तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले. यानंतर सदर ट्रॅक्टर चालकाने ते ट्रॅक्टर खडके (ता. एरंडोल) येथे आणले असता त्याठिकाणी राजू रामचंद्र नन्नवरे हा आला आणि त्याने सदर ट्रक्टरवरील चालकास खाली उतरून स्वतः ट्रॅक्टर सुरू करून ते पळवून लावले.
दरम्यान, तलाठी नितीन पाटील यांनी सदर चालकास ट्रॅक्टर थांबविण्याचा इशारा केला असता त्याने ट्रॅक्टरची तलाठ्याच्या मोटारसायकलाला धडक दिली. यामध्ये नितीन पाटील हे जखमी झाले असून त्यांच्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात राजू रामचंद्र नन्नवरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक देखील करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.