जळगाव, 18 सप्टेंबर : जळगावातील शिवतीर्थ मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालावर पीकविमा, शेतकरी कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केलं. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सरकारविरोधात आंदोलन केले.
…अन् थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात धडक –
दरम्यान, हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांसह निघालेला आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोहोचला. यावेळी शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी स्वतः स्वीकारण्यासाठी न आल्याने बच्चू कडू यांच्यासह आंदोलक आक्रमक झाले. यानंतर बच्चू कडू यांनी स्वतः गेट उघडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत आयुष प्रसाद यांच्या दालनात धडक दिली. यावेळी काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं.
View this post on Instagram
बच्चू कडू यांची प्रतिक्रिया –
जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात धडक दिल्यानंतर माध्यमांसोबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, निवदेन स्वीकारण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांना खाली बोलवलं होतं. पण ते खाली आले नाही. मग आम्हीच त्यांच्याकडे आलो. असा कुठला नियम आहे का की 20 किंवा 10 जण आले पाहिजे. जिल्हाधिकारी खाली आले असते तर आम्ही वर आलो नसतो. मात्र, ते खाली आले नाही म्हणून आम्ही वर आलो.
दरम्यान, जंगलात वाघ जसा हरिणाची शिकार करतो….मोठा मासा छोटा माशाला खाऊन जातो, तशी अवस्था आता शेतकऱ्यांची झालीय. शेतकऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यापासूनही बंधन आहेत. शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यापासून कोणी पोलीस हाणामारी करत असतील तर त्यांच्या देखील निषेध आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन स्वीकारण्यासाठी खाली यायला काय हरकत होती, असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला.