मुंबई, 17 एप्रिल : महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. दरम्यान, महायुती सरकार येऊन 100 दिवसांहूनही अधिक दिवस झाल्याने कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली नाहीये. यावरून राज्याचे माजी मंत्री तथा प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महायुती सरकारला धारेवर धरले असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मोठा इशारा दिला आहे.
बच्चू कडू यांची मंत्रालयात कृषीमंत्र्यांसोबत बैठक –
बच्चू कडू यांनी नुकतेच मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. यावेळी त्यांना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालयात येऊन बैठकीत बोलण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार बच्चू कडू यांनी आज कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मंत्री कोकाटेंसोबत चर्चा केली. यानंतर कडू यांनी माध्यमांसोबत संवाद साधत सरकारला इशारा दिलाय.
बच्चू कडू काय म्हणाले? –
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार तयारीत असून ती कधी दिली जाईल हे मला सांगता येणार नाही. मात्र, त्यासंदर्भातील प्रस्ताव माझ्याकडून कॅबीनेटपर्यंत दिला जाईल, असे आश्वासन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. यामुळे कर्जमाफीच्या संदर्भात आमचे समाधान झाले नसून 28 तारखेला आमचं आंदोलन घोषित करणार आहोत. सर्वात आधी कोणत्या मंत्र्याच्या गाडीची हवा सोडायची आणि रेल रोको पर्यंत तसेच महाराष्ट्रभर आंदोलन कसे करायचे, हे ठरवू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय.
बच्चू कडूंचा सरकारवर आरोप –
लाडक्या बहिण योजनेचा आणि शेतकरी कर्जमाफीचा काही संबंध नाही. उलट शक्तीपीठ महामार्ग, समृद्धी महामार्ग तसेच पुणे मेट्रो सारख्या प्रकल्पांसारख्या योजना सुरू आहेत. याच अर्थाने माझा नेहमी आरोप आहे की, ज्यामधून कमीशन मिळतं त्याच योजना बजेटमधून केल्या जातात. अशा लाखो-करोड रूपयांच्या अनेक योजना आहेत, ज्याद्वारे सामान्य लोकांच्या भल्यापेक्षा सरकारमधील लोकांचं जास्त भलं होतंय. पक्ष मजबुतीच्या या योजना आहेत. तर दुसरीकडे कर्जमाफीमुळे काय होतं की, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जाते म्हणून अशा योजना त्या बाजूला ठेवतात, असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर केलाय. जिस है दम, उस मैं हैं कमिशन अशी टीका देखील त्यांनी केलीय.
बच्चू कडू म्हणाले की, कर्जमाफीचा मुद्दा हा मुळात आमचा नव्हता तो देवेंद्र फडणवीसांचा होता. तसेच 7/12 कोरा करण्याचं त्यांनी दहा वेळाहून अधिकदा सांगितलं होतं. म्हणून देवेंद्रजींचं भाषण आम्ही प्रत्येक गावात लावणार आहोत आणि जोपर्यंत 7/12 ते कोरा करत नाहीत, तोपर्यंत आम्ही हा मुद्दा सोडणार नाही. काहीही झालं तरी तो मुद्दा आम्ही सोडणार नाही. म्हणजे ते जरी करत नसले तरी आम्ही त्यांच्याकडून /12 ते कोरा करून घेतल्याशिवाय राहणार नाही. अर्थात वाद्यापासून ते दूर जात आहोत म्हणून त्यांना आठवण करून देऊ, असेही कडू म्हणाले आहेत. महायुती सरकारने आल्या आल्या 7/12 कोरा करू असे सांगितले होते. 5 वर्षांनी आल्या-आल्या होते का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी 7/12 कोरा करण्यासाठी मुहू्र्त काढा आणि चांगल्या ब्राम्हणांना बोलवा पण तारीख आम्हाला द्या, असेही कडू म्हणाले.
हेही वाचा : “म्हणून या सरकारवर 420 चा गुन्हा दाखल केला गेलाच पाहिजे अन्…”, रोहिणी खडसे महायुती सरकारविरोधात आक्रमक