मुंबई, 6 फेब्रुवारी : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचा संबंध असल्याचे सांगितले जात असल्याने मंत्री धनंजय मुंडे यांचा विरोधकांकडून मंत्रीपदाचा राजीनामा मागितला जात आहे. अशातच करूणा मुंडे यांनी दाखल केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणावर कोर्टाने मोठा निकाल दिला आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
धनंजय मुंडे हे माझे पती असे सांगत त्यांनी माझ्यावर घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप करूणा मुंडे यांनी केला होता. याबाबतची याचिका त्यांनी वांद्रे कौटुंबिक न्यायालयात दाखल केली होती. दरम्यान, याप्रकरणावर आता वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने मोठा निकाल दिला असून करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पत्नी असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला आहे.
तसेच करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. यासोबतच धनंजय मुंडे यांनी कौटुंबिक हिंसाचार केल्याचा निर्वाळाही न्यायालयाने दिला आहे.धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत –
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हा अटकेत आहे. यावरून धनंजय मुंडे हे मागील काही महिन्यांपासून चांगलेच वादात अडकले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीशी असलेल्या संबंधावरून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. यासोबतच काही दिवसांपूर्वीच कृषी मंत्री असताना त्यांनी घोटाळा केल्याचा आरोप देखील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. अशातच आता करुणा शर्मा यांच्या याचिकेवर वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने निकाल दिल्याने धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत आले आहेत.हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत