बीड – राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना बीड जिल्ह्यात एका सरंपचाच्या हत्येच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचे आधी अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.
सरपंच संतोष देशमुख हे मस्साजोग येथील सरंपच होते. येथील ग्रामस्थांनी देशमुख यांच्या हत्येचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संतप्त नागरिकांनी रस्ता रोको केला आणि बसची तोडफोडही करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर काल दिवसभर केज आणि मस्साजोग या ठिकाणी हिंसक आंदोलन झाल्याचे पाहायला मिळाले.
त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाला भेट दिल्यानंतर जमाव शांत झाल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासनाशी बातचीत केली आणि अखेर काल रात्री दहा वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
असा राहिला राजकीय प्रवास –
संतोष पंडितराव देशमुख यांचे वय 45 वर्षे होते. ते बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील रहिवासी होते. त्यांची राजकीय कारकीर्द पाहता 2012 ते 2017 दरम्यान मस्साजोग गावाचे उपसरपंच होते. तसेच 2017 ते 2022 दरम्यान संतोष देशमुख यांच्या पत्नी सरपंच होत्या. त्यानंतर 2022 ते आजपर्यंत संतोष देशमुख हे सरपंच होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरुन त्यांची गावाच्या राजकारणावर पकड असल्याचे दिसून येते. दरम्यान, त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा आणि मुलगी, नातेवाईक आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रतिक भीमराव घुले (वय 25, रा.टाकळी ता.केज), जयराम माणिक चाटे (वय 21 रा.तांबवा ता. केज), महेश सखाराम केदार (वय 21 रा. मैंदवाडी ता.धारुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सीआयडी चौकशीची मागणी मान्य –
या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. ही मागणीही मान्य करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिली आहे.