मुंबई : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत असतानाच काल बीडमधील एका शिक्षकाने फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केली. धनंजय अभिमान नागरगोजे असे या मृत शिक्षकाचे नाव आहे. धनंजय नागरगोजे हे बीड जिल्ह्यातील केळगाव येथील आश्रम शाळेत मागील 18 वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करत होते. मात्र, 18 वर्षांपासून त्याना पगार मिळाला नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आणि त्यातूनच त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या या घटनेनंतर पुन्हा एकदा आता विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न नव्याने चर्चेत समोर आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आता या घटनेवर महत्त्वाचे भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे यांनी यांनी बीड जिल्ह्यातील या घटनेचा उल्लेख करत सरकारपुढे प्रश्न मांडले आहेत. तसेच, शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सुप्रिया सुळे यांनी लिहिले की, बीड जिल्ह्यातील धनंजय नागरगोजे या शिक्षकाची आत्महत्या अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात तळागाळातील जनतेपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी आयुष्य वेचले. त्याच महाराष्ट्रात शिक्षकाला आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागतो हे राज्याला भूषणावह नाही. शिक्षकांना आदराने ‘गुरुजी’ म्हटले जाते. हे गुरुजी भावी पिढ्या घडविण्यासाठी सदैव काम करीत असतात. त्यांचे प्रश्न व अडचणी शासनाने समजून घेतल्या पाहिजेत. शासनाने त्यांच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक व संवेदनशीलतेने विचार करण्याची गरज आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सुटले तर अशा घटना घडणार नाहीत. दिवंगत शिक्षक धनंजय नागरगोजे यांना न्याय देण्यासाठी शासनाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी विनंती करत सुप्रिया सुळे यांनी शिक्षक धनंजय नागरगोजे यांना श्रद्धांजली वाहिली.
बीडमधील शिक्षक आत्महत्या प्रकरण नेमकं काय?
मृत शिक्षक धनंजय नागरगोजे हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील देवगाव या ठिकाणचा रहिवासी होते. ते केळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक होते. 2019 मध्ये राज्य सरकारकडून 20 टक्के अनुदान घोषित करण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झालीच नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करत असताना अनेक अडचणी आल्या.
दरम्यान, काल सकाळी धनंजय नागरगोजे त्यांनी बीड येथील कृष्णा अर्बन बँकेच्या परिसरात गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेला. मात्र, शिक्षकाने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचल्याने त्याचा हा मृतदेह पाहून घरच्यांना दुःख आवरले नाही आणि कुटुंबियांचा मोठा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळाला.
हेही वाचा – घरकुलांना मोफत वाळू मिळणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती, नेमकं काय म्हणाले?