इसा तडवी, प्रतिनिधी
जामनेर/भडगाव, 16 ऑगस्ट : राज्यात एकीकडे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना तालुका स्तरावर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भडगाव तालुक्यातील शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी (अजित पवार गट) गटातील कार्यकर्त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. भडगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने हा शिवेसना (शिंदे गट) आमदार किशोर पाटील व राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांना धक्का असल्याचे मानले जात आहे.
भाजपात जाहीर प्रवेश –
भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शिवसेनेचे (शिंदे गट) नगरसेवक लखिचंद पाटील व भडगाव तालुका राष्ट्रवादीचे सरचिटणीस जगदीश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पाचोरा भाजपचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात जामनेर येथे भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.
पाचोऱ्यातील राजकारण कोणत्या दिशेने जाणार?
गेल्या वर्षभरात राज्यस्तरापासून ते तालुका स्तरापर्यंत अनेक साऱ्या घडामोडी घडून गेल्या. सुरूवातीला शिवसेनेतील फूटीमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिवसेना (शिंदे गट)- भाजपचे सरकार अस्तित्वात आले. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, या राजकीय उलथापालथीला एक वर्ष पूर्ण झाले तोच जुलै 2023 मध्ये अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही दोन गट पडले व अजित पवार हे देखील उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान, आता पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघातील राजकारण कोणत्या दिशेने जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.