भुसावळ, 22 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यात अलीकडेच लाचखोरींचे प्रकरण ताजे असताना भुसावळातून लाचखोरांवर एसीबीने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयीन वॉरंट रद्द करून घेण्यासाठी 5 हजार रूपयांची लाचेची मागणी करत 2 हजार रूपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज 22 ऑगस्ट रोजी दुपारी रंगेहात पकडले.
याप्रकरणी दोन सहायक फौजदार आणि एका खाजगी इसमाला अटक करण्यात आली आहे. बाळकृष्ण मुकुंदा पाटील ( वय 55, सहा. फौजदार, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन), आत्माराम सुधाम भालेराव (वय 57, सहा. फौजदार, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन) तसेच ठाणसिंग प्रतापसिंग जेठवे (वय 42, मजूर, रा. शिपूर कन्हाळा, ता. भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत.
नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरोधात खामगाव न्यायालयात चेक बाऊन्स प्रकरणात अटक वॉरंट निघाले होते. हे वॉरंट अमलात आणू नये तसेच मुदतवाढ मिळवून देण्यासाठी आरोपी बाळकृष्ण पाटील व आत्माराम भालेराव यांनी 5 हजार रुपयांची लाच मागणी केली होती. तक्रारीनंतर पडताळणी करण्यात आली असता त्यांनी 2 हजार रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदाराच्या तक्रारीची दखल घेत सापळा लावला. या सापळ्यात आरोपी बाळकृष्ण पाटील याच्या सांगण्यावरून आरोपी ठाणसिंग जेठवे याच्या मार्फत ही रक्कम स्वीकारल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, त्यांच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यांनी केली कारवाई –
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोउपनिरी दिनेशसिंग पाटील,पोउपनिरी सुरेश पाटील चालक, पोहेकॉ किशोर महाजन, पोना बाळु मराठे, पोकॉ प्रदिप पोळ, पोकॉ/ भुषण पाटील, पो. कॉ/ प्रणेश ठाकूर आदी पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा : Video | जळगाव LCB आणि भुसावळ पोलिसांची संयुक्त कारवाई; गांजा तस्करी करणारा जेरबंद