भुसावळ, 1 जून : भुसावळ येथे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनिल राखुंडे यांच्यावर गोळीबार करत हत्या केल्याप्रकरणी तीन संशियतांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, काल रात्री उशिराने त्यांना भुसावळ येथील रेल्वे न्यायालयात दाखल करण्यात आले असता आरोपींना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुनावणीत नेमकं काय घडलं? –
भुसावळातील दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत आरपीय जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी व विनोद चावरिया यांना धुळ्यातील साक्री येथून तर करण पथरोड याला नाशिक येथून अटक करण्यात आली. दरम्यान, त्यांना भुसावळ येथे आणण्यात आले. यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करत असताना कुठेही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.
आरोपींना पोलीस कोठडी –
भुसावळातील दुहेरी हत्याकांडातील अटक केलेल्या आरोपींना काल शुक्रवारी दुपारपर्यंत न्यायालयात हजर केले जाणार होते. मात्र, तेथील सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्यावरून आरोपींना थेट रात्री उशिरा रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, रेल्वे न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत आरोपींना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भुसावळ दुहेरी हत्याकांडाचे नेमकं कारण काय? –
भुसावळ दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी करण पथरोड याला नाशिक येथून पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. यानंतर करणला काल भुसावळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, करण याने खुनाची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यातील हॉस्पिटलमधील एका मोठ्या साफसफाईचा ठेका या खूनप्रकरणातील एक संशयित आरोपी शिव पथरोड याच्याकडे होता. मात्र, पथरोडकडील हा सफाईचा ठेका संतोष बारसे याने आपल्या जवळच्या मित्राला मिळवून दिला. आणि त्यामुळे शिव याचा बारसेवर राग होता. आणि हे कारण देखील या दुहेरी हत्याकांडामागे असल्याचे बोलले जात आहे.
हत्याकांडाची सोशल मीडियावर चर्चा –
भुसावळ शहरात बुधवारी रात्री घडलेल्या दुहेरी हत्याकांडानंतर तिसऱ्या दिवशी शहर पूर्वपदावर आले आहे. भुसावळात नेहमीप्रमाणे बाजारपेठ, व्यापारी प्रतिष्ठाने सुरू होऊन वाहनांची पूर्ववत वर्दळ पाहायला मिळाली. दरम्यान, भुसावळ दुहेरी हत्याकांडाची चर्चा सोशल मीडियावर कायम होती.