भुसावळ, 10 फेब्रुवारी : भुसावळ रेल्वे विभागाकडून विशेष सुरक्षा जागरूकता अभियानासोबतच तिकीट तपासणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत जानेवारी महिन्यात तब्बल 69 हजार प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. या तिकीट तपासणी मोहिमेत विनातिकीट, अनियमित तिकीट, बिना बुकिंग सामान असलेल्या प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची माहिती भुसावळ रेल्वे विभागाच्या जनसंपर्क विभागाने दिलीय.
69 हजार प्रवाशांवर दंडवसुलीची कारवाई –
भारतीय रेल्वेच्या भुसावळ विभागाने हाती घेतलेल्या या मोहिमेत तिकीट तपासणीत एकाच महिन्यात तब्बल 69 हजार रेल्वेतून विनातिकीट व सामानाची बुकिंग न करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. भुसावल मंडळाने तिकीट तपासणी मोहिमेद्वारे विनातिकीट असलेल्या 69 हजार प्रकरणांमधून 4 कोटी 74 लाख रुपये अतिरिक्त महसूल मिळवला आहे. हा महसूल मागील वर्षांच्या तुलनेत 34.66 टक्क्यांनी वाढलाय.
रेल्वेचे सुरक्षित प्रवास जागरूकता व जनजागृती अभियान –
रेल्वे प्रवास करत असताना कुठलीही दुर्घटना घडू नये. तसेच सुरक्षितरित्या प्रवास व्हावा यासाठी रेल्वे विभागाच्या महत्त्वाच्या स्थानकांवर तिकीट तपासणी कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा बल या कर्मचाऱ्यांसोबत तिकीट तपासणी तसेच सुरक्षित प्रवास जागरूकता व जनजागृती अभियान राबवले जात आहे. गेल्या काही वर्षांतील रेल्वे दुर्घटना लक्षात घेता रेल्वे विभागाकडून विशेष जागरूकता अभियान राबवले जात आहे. रेल्वेतील प्रवासादरम्यान अफवांपासून सजग राहणे, सुरक्षित प्रवास, चेन पुलिंग दरम्यान ट्रेनमधून न उतरण्याचे, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आरपीएफ किंवा रेल्वे कर्मचारी यांना संपर्क करावे आदी माहिती प्रवाशांना रेल्वे स्थानकात आलेल्या गाड्यांमध्ये दिली जात आहे.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत