मुंबई, 12 ऑक्टोबर : विधानसभा निवडणूक जाहीर होण्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना राज्यातील महायुतीच्या सरकारने होमगार्डसाठी मोठा निर्णय घेतलाय. राज्यातील 55 हजार होमगार्ड्सचे मानधन दुप्पट करण्यात आले असून याबाबतचा शासन निर्णय आज दसऱ्याच्या दिवशीच जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचे माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
होमगार्ड्सच्या मानधनात दुप्पट वाढ –
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी होमगार्ड्सच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता याच निर्णयाच्या अमंलबजावणीला सुरुवात झाली असून या निर्णयाबबतचा शासन निर्णय (जीआर) जाहीर करण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार, होमगार्ड्सचे मानधन प्रतिदिवस 570 रुपयांवरून थेट 1 हजार 83 रुपये करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात एकूण 11 हजार 207 होमगार्ड्सची नव्याने भरती करण्यात आली आहे. सध्या या होमगार्ड्सना प्रशिक्षण दिले जात असून या प्रशिक्षणार्थी होमगार्ड्सनांही नव्या निर्णयानुसारच मानधन मिळणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांची माहिती –
होमगार्ड्ससंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की, राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये प्रतिदिन 570 रुपयांवरून ते आता 1083 रुपये इतके करण्यात आले आहे. तसेच आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे. दरम्यान, विविध भत्त्यांची रक्कमसुद्धा दुप्पट करण्यात आली असून उपहार भत्ता 100 वरून 200 रुपये तर भोजन भत्ता 100 वरून 250 रुपये इतका करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक मानधन –
राज्यातील होमगार्ड्सचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्याने दसऱ्यानिमित्त त्यांना एका प्रकारे भेटच मिळाली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा एकूण 55 हजार होमगार्ड्सना लाभ मिळणार आहे. दरम्यान, या निर्णयानंतर राज्यातील होमगार्ड्सना इतर राज्यातील होमगार्ड्सच्या तुलनेत सर्वाधिक मानधन मिळणार आहे.
‘या’ तारखेपासून निर्णयाची होणार अंमलबजावणी –
राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या निर्णयाचा राज्यातील सुमारे 55,000 होमगार्डना लाभ मिळेल. तसेच 1 ऑक्टोबर 2024 पासून ही वाढ देण्यात येईल. गेल्याच महिन्यात सुमारे 11,207 होमगार्ड्सची भरती प्रक्रियासुद्धा पूर्ण करण्यात आली असून सध्या त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यांना देखील याचा फायदा होणार आहे.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : ‘श्यामची आई’ फेम मराठी अभिनेत्री गौरी देशपांडे यांची विशेष मुलाखत