मुंबई – एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. याबाबतचे पत्र घेऊन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदय सामंत हे राजभवनात दाखल झाले. त्यांनी हे पत्र राजभवनाचे सचिव प्रविण दराडे यांच्याकडे दिले. यानंतर त्यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली. सर्व आमदारांनी त्यांना विनंती केली होती. त्यानुसार काल आणि आज सर्व आमदार त्यांचे मनधरणी करत होते. त्यांनी केलेली कामे, त्यांची प्रतिमा याचा फायदा पक्षाला होईल, अशी भावना शिवसेनेच्या आमदारांची आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तर याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर दोन उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शपथ घेणार आहेत.
भाजप विधीमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार आहेत. तसेच अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये सहभागी होतील की नाही, हे अद्याप स्पष्ट नव्हती. याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी पुन्हा एकदा सस्पेन्स वाढवला होता. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे.
एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये सामील व्हावे, यासाठी शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी, आमदारांनी आग्रह धरला होता. त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारावे, अशी सर्वांची इच्छा होती. त्यावर आता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवत होकार दिला.
काल काय म्हणाले होते एकनाथ शिंदे –
महायुतीमध्ये खातेवाटपावरुन नाराजीनाट्य सुरू असल्याची चर्चा आहे. काल महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी एकनाथ शिंदे यांना ते देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होणार का, या प्रश्नावर ते म्हणाले की, संध्याकाळी आम्ही तुम्हाला याबाबत सांगतो. थोडं थांबा. देवेंद्रजी माझ्याकडे आले, तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. आमच्या सर्व महायुतीच्या आमदारांचाही जो आग्रह आहे, सर्वांना मी धन्यवाद देतो. सगळ्यांचा आदर करतो. त्यामुळे तुम्हाला सांगू.
दरम्यान, काल संध्याकाळीही देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र, एकनाथ शिंदेंची भूमिका स्पष्ट न झाल्याने ते मंत्रिमंडळात सहभागी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.