मुंबई, 4 सप्टेंबर : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरावरील 13 संघटनेची कृती समितीनं त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन कालपासून राज्यव्यापी संप पुकारला होता. दरम्यान, आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली. या बैठकीत एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, या निर्णयामुळे लालपरी पुन्हा रस्त्यावर धावणार आहे.
आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं? –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर एसटी कर्मचारी संघटनांनी आपला संप मागे घेतला आहे. त्यामुळे आजपासूनच गाड्या सुरू होणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांना पगारात साडे सहा हजारांची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत आनंद व्यक्त केला असून कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी सह्याद्री गेस्ट हाऊस बाहेर जल्लोष केला आहे.
मध्यरात्रीपासून बस धावणार –
उद्योगमंत्री उदय सामंत याबाबत सांगितले की, मुख्यमंत्री महोदयांनी साडे हजार रुपये पगारवाढीची मागणी मान्य केली आहे. माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे की, तातडीने हा संप कर्मचारी संघटना मागे घेतील. आजपासूनच गाड्या सुरू होतील. लवकरच गणेशोत्सवाचा सण असून कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाचे आहे. त्यामुळे,आजपासूनच गाड्या सुरू होतील, अशी माहितीही मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
हेही वाचा : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले महत्वाचे आदेश