मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या सर्वात लोकप्रिय योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्यापही महिलांच्या खात्यावर पडला नाही. फेब्रुवारी महिना संपून गेला तरी खात्यावर पैसे न झाल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आपल्या खात्यावर फेब्रवारी महिन्याचे 1500 रुपये कधी पडतील, याची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडूनही अद्याप फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना न मिळाल्यामुळे सरकारवर टीका केली जात आहे. मात्र, याबाबत आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
काय म्हणाल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे –
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त तटकरे विधीमंडळात दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. माध्यमांशी बोलताना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा जो हप्ता आहे, तो आम्ही 8 मार्चला महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अनुसरुन सर्व महिलांच्या खात्यात थेट उपलब्ध करुन देणार आहोत. साधारणपणे 5-6 तारखेपासून ही प्रक्रिया सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यावर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता त्याठिकाणी उपलब्ध होणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला याचे औचित्य साधून आम्ही यंदाच्या वेळी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींना खात्यात जमा करणार आहोत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
विरोधक हे सुरुवातीपासून आरोप करत आहेत. आम्ही साधारणपणे जवळपास अडीच कोटी महिलांपर्यंत पोहोचू शकलो आहोत. गेल्या महिन्यातही जवळपास दोन कोटी 40 लक्ष इतक्या महिलांपर्यंत लाभ पोहोचला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातही जे लाभार्थी आहेत, ते तशाच पद्धतीने राहणार आहेत.
ही योजना जाहीर झाल्यापासूनच विरोधकांना ही योजना खुपते आहे आणि आता तर ज्या पद्धतीने महिलांचा प्रतिसाद गेल्या 5-6 महिन्यांपासून मिळत आलेला आहे, त्यातून विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भात पसरलेले आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचे काम करत आहेत, अशी टीका करत महायुतीचे सरकार सक्षम आहे आणि अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजना यशस्वीपणे पुढे आम्ही चालू ठेवणार आहोत, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.