जळगाव, 29 सप्टेंबर : जळगाव शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोरी आली आहे. जळगाव शहराचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीच्या एल. के. फार्म हाऊसमध्ये बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक विदेशी नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव पोलिसांनी काल जळगाव शहरापासून 3-4 किमी अंतरावर ममुराबाद रोडवरील एल. के फार्म नावाच्या फार्म हाऊसवर छापा टाकला असता हा सर्व प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी जळगाव शहराचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह 8 जणांना ताब्यात घेतले.
नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण –
जळगाव जिल्हा पोलीस दलाचे अपर पोलीस अधीक्षक अशोख नखाते यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणाची माहिती दिली. काल माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जळगाव शहरापासून ३-४ किमी अंतरावर ममुराबाद रोडवर एल. के फार्म या नावाचे एक फार्म हाऊस आहे. याठिकाणी एक बोगस कॉल सेंटर वेगवेगळ्या कंपनीचे एजंट असल्याचा बनाव करुन विदेशी नागरिकांची फसवणूक करतात. रात्रीच्या वेळी हे कॉल केले जातात, अशी माहिती काल सायंकाळी आम्हाला माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीबाबत पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांना कल्पना देण्यात आली. यानंतर त्यांनी दिलेल्या आदेशावरुन पोलीस पथक तयार करण्यात आले. यानंतर काल दुपारी 1 वाजेच्या दरम्यान पोलिसांनी छापा टाकला असता मिळालेली माहिती खरी असल्याचे समोर आले. घटनास्थळावरुन 31 लॅपटॉप आढळून आले. एका हॉलमध्ये हे बनावट कॉल सेंटर चालवले जात होते.
या ठिकाणी दोन सिस्टिम सुरू असल्याचेही यावेळी आढळून आले. त्यात पोलिसांनी तपास केला असता, रात्रीच्या वेळी विदेशी नागरिकांना कॉल करण्यात आलेले आहेत. तसेच अमेझॉन, इतर वेगवेगळ्या कंपन्यांचे एजंट असल्याचे दाखवून खोटी कारणे देऊन आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. इतर सिस्टिम बंद असल्याने त्यातील डाटा दिसलेला नाही. हे सर्व लॅपटॉप जप्त करण्यात आल्याची माहितीही अपर पोलीस अधीक्षक अशोख नखाते यांनी दिली.
25 लोक करत होते काम –
तसेच सबराज शाहबाज आलम, झीशान नुरी, शाकीब आलम आणि हाशीर रशीद हे 4 संशयित आढळून आलेले आहेत. हे चारही जण कोलकाता येथील आहेत. तसेच हे चारही जण सज्ञान आहेत. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली असता याठिकाणी 20 ते 25 जण काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली. 9 तारखेनंतर हा सेटअप झाला. तसेच हे 25 जण मुंबईवरुन आणि इतर ठिकाणांहून येऊन याठिकाणी काम करतात. शनिवार-रविवार असल्याने यातील 19-20 जण सुट्टीवर गेले, असे या आरोपींनी पोलिसांना सांगितले. या सर्वांची माहिती पोलिसांना मिळाली असून पोलीस त्यानुसार तपास करत आहेत. यातील हँडलर हे मुंबईवरुन हँडल करत होते. यामध्ये अकबर, आदिल आणि इमरान असे पोलिसांना समजल्याची माहितीही अपर पोलीस अधीक्षक नखाते यांनी दिली.
एल. के फार्म हे फार्म हाऊस ललित कोल्हे यांच्या नावावर आहे. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच नरेंद्र चंदू आगारिया आणि राकेश चंदू आगारिया हे दोन्ही याठिकाणी सर्व मदत करत होते. त्यांचाही सहभाग या बनावट कॉल सेंटरमध्ये दिसून आलेला आहे. याठिकाणी मुंबईवरुन आणलेला अली नावाचा कुक आहे, तो सर्वांना जेवण बनवून देत होता. असे एकूण 8 जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अजून कुणाकुणाचा यात सहभाग आहे, याबाबत पोलीस तपास करत असून जळगाव जिल्ह्यात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.