मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आज मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आणि सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अखेर धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. थोड्या वेळापूर्वी धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस –
आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिला आहे. यांचा राजीनामा मी स्विकारला आहे आणि पुढील कार्यवाहीकरता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना याठिकाणी राजीनामा देऊन याठिकाणी मुक्त करण्यात आलेले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मागच्या वर्षी 9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातून ही हत्या झाली होती. यानंतर धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड या हत्या प्रकरणातील सूत्रधार असल्याचे आरोप झाले होते. याप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासासाठी एसआयटी नेमण्याचे आदेश दिले. त्यानंतर सीआयडी आणि एसआयटीने संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास केला. यामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग आढळून आला होता. त्यामुळे सीआयडीने वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती. नुकतेच या प्रकरणात 1500 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले होते.
सातत्याने विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर आज धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली.