चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 13 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच आज भारतीय जनता पक्षाने लोकसभा उमेदवारीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभेसाठी खान्देशात भाजप कुणाकुणाला संधी देणार याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या.
खान्देशात कुणाकुणाला मिळाली संधी –
भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या यादीत खान्देशात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी स्मिता वाघ तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. तसेच धुळ्यासाठी सुभाष भामरे तर नंदुरबारसाठी डॉ. हिना गावित यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे.
जळगावमध्ये स्मिता वाघ तर रावेरसाठी रक्षा खडसे –
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापत विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघासाठी खासदार रक्षा खडसे यांना भाजपच्यावतीने पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, रक्षा खडसे तिसऱ्यांदा लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
जळगावमध्ये उन्मेश पाटील यांना उमेदवारी नाकारली –
सध्या उन्मेश पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहे. मागील 5 वर्षांची कामगिरी पाहता त्यांनी पहिल्या 10 लोकप्रिय खासदारांच्या यादीतही स्थान मिळवले होते. त्यामुळे या मतदारसंघाची उमेदवारी उन्मेश पाटील यांनाच पुन्हा मिळणार की भाजप धक्कातंत्र वापरुन दुसऱ्या उमेदवाराला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता यामध्ये भाजपने उन्मेश पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
धुळ्यात पुन्हा सुभाष भामरे यांना उमेदवारी –
गेल्या काही दिवसांपासून धुळ्याचे विद्यमान खासदार सुभाष भामरे यांचे तिकीट कापले जाणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, भाजपने पुन्हा एकदा खासदार सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने ते लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांना हॅट्रिकची संधी –
भाजपने नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी राज्य सरकरामध्ये कॅबीनेट मंत्री असलेले विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. हिना गावित यांना देखील उमेदवारी जाहीर केली आहे. डॉ. हिना गावित ह्या सध्या खासदार असून त्या तिसऱ्यांदा खासदारीकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. दरम्यान, डॉ. हिना गावित यांना लोकसभा निवडणुकीत हॅट्रिकची संधी मिळणार आहे.
हेही वाचा : Breaking : भाजपचे धक्कातंत्र, जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली संधी