चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 8 मे : उन्मेश पाटील यांचं तिकीट कापून आम्ही त्यांना एकप्रकारे वाचवलं, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता लगावला. आज पाचोरा येथे जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उन्मेश पाटील यांच्यासह महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टिका केली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस –
या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, ही निवडणूक गल्लीची नाही तर दिल्लीची निवडणूक आहे. काल उद्धव ठाकरे हे जळगावमध्ये आले होते. त्यांच्या भाषणात देशाच्या विकासाचा, समाजाच्या विकासाचा एकही मुद्दा नाही. त्यांनी त्यांच्या भाषणात मोदीजींना शिव्या दिल्या. महायुतीला शिव्या दिल्या. पण या आघाडीत नेता नाही, नीती नाही आणि नियतही नाही, अशी ही आघाडी आहे. ते सांगतात, 4 तारखेनंतर भाजपवाल्यांना बिळातून काढून मारू. अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. तेव्हा बिळात होते. तेव्हा बाहेर आले नाही आणि आज आम्हाला बिळातून काढू मारू म्हणतात. महायुतीचे लोकं हे वाघासारखे आहेत.
निवडणुकीनंतर उबाठा सेना काँग्रेसमध्ये विलीन होणार –
सत्य कधीतरी तोंडात येतं. पवार साहेब सत्य बोलले. या लोकसभेच्या निवडणुकीनंतर सर्व लहान पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. त्यामुळे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि उबाठा काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत. त्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे, हे त्यांनी सांगून दिलंय. ज्यादिवशी काँग्रेसशी युती करण्याची वेळ येईल, तेव्हा माझ्या शिवसेनेचं दुकान मी बंद करेल, असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. पण त्यांच्या मुलाने काँग्रेसशी युती तर केलीच. पण या निवडणुकीनंतर त्यांची उबाठा सेना काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्याचे शिल्पकार पवार साहेब असतील, अशी टीकाही त्यांनी केली.
उन्मेश पाटील यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले –
ते पुढे म्हणाले की, मागच्याही वेळी भाजप आणि महायुतीच्या उमेदवाराला तुम्ही निवडून आलं. पण मोठ्या मतांनी निवडून आणल्यानंतर 5 वर्षात त्यांचा जो व्यवहार होता, खरं म्हणजे निवडणुकीचा काळ आहे सर्व गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात, त्यामुळे त्याबाबत बोलणार नाही. पण त्यांचं तिकीट का कापलं, एकदा त्यांनी देखील याचं आत्मचिंतन केलं तर त्यांच्या हातून काय काय चूका झाल्या, हे त्यांच्या लक्षात येईल आणि खरं म्हणजे, त्यांचं तिकीट कापून आम्ही एकप्रकारे त्यांना वाचवलं आहे. ज्या मार्गाने ते चालले होते, त्या मार्गावर जाण्यापासून आम्ही त्यांना परावृत्त केले, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सबका साथ सबका विकास म्हणत आपली ट्रेन विकासाकडे
कोण देशाला विकासाकडे नेईल, कोण आपल्या जीवनात परिवर्तन आणेल, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. या निवडणूक दोन पर्याय आहेत. ते म्हणजे विश्वगुरू नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्त्वात 24 पक्षांची खिचडी आहे. मला पाहा फुले वाहा, अशी खिचडी आहे. मात्र महायुती म्हणजे विकासाची ट्रेन आहे. याला मोदीजींचे इंजिन आहे, असा दावाही त्यांनी केला. सबका साथ सबका विकास म्हणत आपली ट्रेन विकासाकडे जात आहे. राहुल गांधींकडे फक्त इंजिन आहे, तिथे बोग्या नाहीत. राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता दीदी, सर्वच म्हणतात आम्ही इंजिन आहोत. पण इंजिनमध्ये सर्वसामान्यांना जागा नसते. त्यामुळे यांच्या इंजिनमध्ये फक्त आपापल्या कुटुंबीयांना जागा आहे. तुमच्याकरता जागा फक्त मोदीजींच्या गाडीमध्ये आहे, असेही ते म्हणाले.
मोदींच्या विकासकामांचा वाचला पाढा –
जे लोकं येऊन तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतात त्यांना सांगा आम्ही मोदींजींच्या सोबत आहोत. मोदीजींना देशात मोठा चमत्कार केला. 25 कोटी लोकांना गरिबी रेषेवर आणलं. 20 कोटी लोकांना पक्क घर दिलं. 50 कोटी घरांमध्ये गॅस सिलिंडर दिलं. 55 कोटी लोकांच्या घरी शौचालय दिलं. ज्या ठिकाणी पाणी येत नव्हतं, अशा 60 कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी दिलं. 55 कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेंतर्गत 5 लाखांचा उपचार फुकट दिला. 80 कोटी लोकांना मोदींजींना 2020 पासून मोफत रेशन देतात. 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेचं लोन दिलं. यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे. 10 कोटी महिलांना आपल्या पायावर उभे केले. त्यापैकी 3 कोटी महिल्यांना लखपती दीदी बनवणार आहेत. यापूर्वी असं काम कुणीच केलं नव्हतं.
संविधान बदलणार नाही
हे महाविकास आघाडीचे पोपट मिठूमिठू बोलायला लागले. म्हणे 400 पार झाल्यावर संविधान बदलणार. हे खोटारडे लोक आहेत. हे सर्व लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत खोटे बोलतात. पण मोदीजींनी सांगितलंय, जोपर्यंत या भूतलावर चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत बाबासाहेंबाचे संविधान कुणी बदलू शकणार नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, या सभेला महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ तसेच मंत्री गिरीश महाजन, अनिल पाटील, आमदार किशोर पाटील, मंगेश चव्हाण, महायुतीचे नेते उपस्थित होते.
हेही वाचा – “हा जामनेरचा चंगू आणि चाळीसगावचा एजंट मंगू….”, नाव न घेता जळगावच्या सभेत उन्मेश पाटलांची जोरदार टीका