कल्याण, 3 फेब्रुवारी : भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात झालेल्या गोळीबाराच्या धक्कादायक घटना समोर आली आहे. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्येच हा गोळीबार झाला. दरम्यान, याप्रकरणात आमदार गायकवाड आणि त्यांच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण? –
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात वाद झाला. यावरून संतप्त झालेल्या आमदार गणपत गायकवाड यांनी महेश आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केला.
महेश गायकवाड यांची प्रकृती स्थिर –
महेश गायकवाड यांना पाच गोळ्या आणि त्यांच्या एका समर्थकाला गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे. सध्या, महेश गायकवाड यांची प्रकृती स्थिर असून त्या गोळ्या काढण्यामध्ये डॉक्टर यशस्वी झाले आहेत. दरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची ज्युपिटर हॉस्पिटल येथे जाऊन भेट घेतली.
आमदार गायकवाड यांची प्रतिक्रिया –
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी या गोळीबार प्रकरणात माध्यमांसोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पोलीस स्टेशनमधील दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली. या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला होता आणि या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला.
मला केलेल्या कृत्याचा काही पश्चाताप नाहीये. माझ्या मुलांना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोरच मारहाण होत होती. त्यामुळे माझ्यासमोर पर्याय नव्हता. म्हणून आपणच गोळीबार केल्याचे गणपत गायकवाड यांनी सांगितले.
काय आहे नेमका वाद? –
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरापासून दोन्ही गायकवाड गटात कल्याण पूर्वेतील विधानसभेच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. एका 50 गुंठे जमिनीचा वाद सुरू होता त्यामध्ये मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू होते. शुक्रवारी, गणपत गायकवाड यांच्या मुलांसोबत पोलीस स्टेशनमध्ये वाद सुरु असताना गणपत गायकवाड यांनी येऊन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडेचे निधन, इन्स्टापोस्टमध्ये आली धक्कादायक माहिती समोर