चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 22 जानेवारी : भारतीय जनता पार्टीच्यावतीने संघटनपर्व अभियान राबवले जात असून या अभिनयाच्या कामगिरीबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाचोरा भाजपचे प्रमुख अमोल शिंदेंचे अभिनंदन केले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रात काय म्हटले?
पाचोरा भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटले की, ‘भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्व अभियानात सक्रीय सहभागी होत आपण भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता संख्या वाढीसाठी प्रयत्न करीत आहात. आपण 250 व त्याहून अधिक भाजपा सदस्य नोंदणी केल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. अंत्योदयाच्या विचारातून राष्ट्रनिर्माणाकरिता अधिकाधिक लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न आपण यापुढेही करीत राहाल, ही सदिच्छा.’
राज्यात जरी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती असली तरी पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील आणि स्थानिक भाजपचे नेते अमोल शिंदे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. पाचोरा भडगाव विधानसभा हा मतदारसंघ नेहमीप्रमाणे शिवसेनेच्या वाट्याला आला आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून किशोर आप्पा पाटील यांनी निवडणूक लढवली. त्यांच्याविरोधात भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवत त्यांना आव्हान दिले. निवडणुकीत दोघांनी एकमेकांवर टीका टिप्पणी केली. आरोप-प्रत्यारोप केले.
निवडणुकीपूर्वी आमदार किशोर पाटील काय म्हणाले होते?
निवडणुकीपूर्वी सुवर्ण खान्देश लाईव्हच्या टीमने आमदार किशोर पाटील यांची मुलाखत घेतली असता त्यांनी त्यावेळी सांगितले होते की, महाराष्ट्रात महायुतीच्या सरकार आणण्यासाठी जिथे जिथे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उभे असतील त्याठिकाणी भाजपने खंबीरपणे उभे राहावे. ज्यांनी याचे पालन केले नाही, त्याची हकालपट्टी केली जाईल, असं विधान बावनकुळे साहेबांनी केलं आहे. पण माझ्याकडे त्यांचाच तालुकाध्यक्ष उमेदवारीची तयारी करतो आहे, हे भारतीय जनता पक्षाला सगळ्यांना ज्ञात आहे. त्यामुळे येणाऱ्या एक-दोन दिवसात त्याची हकालपट्टी होऊन, त्याच्या जागेवर कुणीतरी भारतीय जनता पक्ष वाचवणारा, चालवणारा एका व्यक्ती ते नियुक्त करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो’.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे किशोर आप्पा पाटील यांनी विजय मिळवला. तर अमोल शिंदे यांचा पराभव झाला. या पराभवानंतर अमोल शिंदे हे पुन्हा एकदा पक्षात सक्रिय झाले असून आता थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमोल शिंदेंचे अभिनंदन केले आहे. त्यामुळे अमोल शिंदे यांची भाजपमध्ये घरवापसी झाल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : माजी मंत्री छगन भुजबळांना दिलासा; ईडीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, नेमकं काय प्रकरण?