गजानन न्हावी, प्रतिनिधी
बोदवड, 25 जानेवारी : बोडवडचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांचे निलंबन करण्यात आले आहे. नितीनकुमार देवरे हे मालेगावात तहसीलदार या पदावर रूजू असताना त्यांनी अवैध बांगलादेशी नागरिकांना जन्म प्रमाणपत्र वाटप केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली. तसेच नायब तहसीलदार संदीप धारणकर यांचेही निलंबन करून प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबतचे निलंबन आदेश महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख यांनी गुरुवारी दिनांक 23 जानेवारी रोजी काढले आहेत.
नेमकं काय प्रकरण? –
यानंतर नितीनकुमार देवरे हे मालेगावचे तहसीलदार असताना त्यांनी शासन निर्देशांनुसार काम न करता आणि शासकीय कामकाजात पुरेशे गांभीर्य न दर्शविता बांगलादेशी रोहिंग्यांना जन्मदाखले देऊन त्यांना आधारकार्ड देण्यात आल्यामुळे त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप असून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी रोहिंग्यांना मालेगावात जन्म दाखले देण्यात आल्याची तक्रार केली होती.
दरम्यान, शासनाने किरीट सोमय्या यांच्या तक्रारीची दखल घेऊन या प्रकरणी मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्यासह नायब तहसीलदार संदीप धरणकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. देवरे याच्या निलंबन काळात जळगाव हे मुख्यालय असणार आहे. तसेच धारणाकर यांचे मुख्यालय नाशिक असणार आहे. या काळात खासगी व्यवसाय किंवा इतर नोकरी करण्यास त्यांच्यावर सक्त मनाई करण्यात आली आहे.
हेही वाचा : narendra chapalgaonkar : मोठी बातमी!, निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन