जालना, 20 सप्टेंबर : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण सुरू आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगे यांचा आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. असे असताना जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली –
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 20 सप्टेंबर रोजी चौथा दिवस आहे. सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करुन मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे 17 सप्टेंबर पासून उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, आता त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. जरांगे यांनी उपचार घेण्यासही नकार दिलाय.
आधाराशिवाय चालणे मुश्कील –
मनोज जरांगे यांना उपोषणाच्या चौथ्या दिवशी चालणे देखील मुश्कील झाले आहे. सहकाऱ्यांचा आधार घेत ते चालताना दिसत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मनोज जरांगे यांना थकवा जाणवताना त्यामध्ये दिसत आहे. ते स्टेज वरून खाली उतरताना ते अचानक खाली बसलेले पाहायला मिळालंय. यावेळी त्यांना उठता येत नव्हतं. दरम्यान, सरकारकडून मनोज जरांगेंना कोणता प्रतिसाद मिळतोय का? याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
मनोज जरांगे यांच्या काय आहेत मागण्या? –
- सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी.
- हैदराबाद गॅझेट लागू करावे.
- सातारा गॅझेट लागू करावे.
- बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट लागू करावे.
- मराठा बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत.