मुंबई, 14 ऑक्टोबर : दिवाळीत प्रवाशांची गर्दी वाढत असते. यानुसार दरवर्षी एसटी महामंडळाकडून दिवाळीत 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात येत असते. दरम्यान, दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली 10 टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाचा मोठा निर्णय –
एसटी महामंडळाकडून दिवाळीनिमित्त दरवर्षी 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला जातो. यंदा देखील 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर या कालावधी दरम्यान तब्बल एका महिन्यासाठी ही भाडेवाढ लागू करण्यात आली होती. मात्र, एसटी महामंडळाने भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने राज्यभरातील प्रवाशांना दिलासा मिळाला असून एसटीने प्रवास करणाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. मात्र, हंगामी भाडेवाढीचा निर्णय रद्द करण्यात आल्यानं महामंडळाच्या तिजोरीत जमा होणारी अतिरिक्त रक्कम मिळणार नाही.
प्रवाशांना दिलासा –
दिवाळीमधील सणांच्या काळात सर्वसामान्य प्रवासी एसटीला प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळते. एसटी महामंडळाकडून 10 टक्के हंगामी भाडेवाढ केल्याने प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. मात्र, यंदा एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली 10 टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.