रावेर (जळगाव), 10 एप्रिल : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, आज सकाळी शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली.
उद्योजक श्रीराम पाटील यांनी मिळाली उमेदवारी –
शरद पवार गटाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार रावेर लोकसभा मतदारसंघात उद्योजक श्रीराम पाटील यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या रक्षा खडसे यांच्याविरोधात ते निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी याआधी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील तसेच संतोष चौधरी यांचे देखील नाव चर्चेत होते. मात्र, उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
कोण आहेत श्रीराम पाटील? –
श्रीराम पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. मात्र, कमी कालवधीतच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला. श्रीराम पाटील हे उद्योजक असून श्री साईराम अँड इरिगेशन ही त्यांची कंपनी आहे. तसेच सिका या इलेक्ट्रिक टू व्हीलरचे ते उत्पादक आहेत. श्रीराम फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत. मराठा समाज भूषण, उद्योग भूषण हे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. दरम्यान, रावेर लोकसभा मतदार संघात मराठा समाजाची मते मोठ्या प्रमाणात असल्याने शरद पवारांनी श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : लोकसभा निवडणूक 2024 विशेष : सत्तेला आव्हान देणारा माणूस, उन्मेश पाटील!