जळगाव – नवीन वीज मीटर बसवण्यासाठी सहाय्यक अभियंत्याने साडेपाच हजार रुपयांची लाच मागितली होती. अखेर तडजोडीअंती साडेचार हजार रुपयांची लाच स्विकारताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहायक अभियंत्यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
अमित दिलीप सुलक्षणे (वय 35 वर्षे, रा. प्लॉट.नं.60-बोरोले १ चोपडा), असे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या लाचखोर सहायक अभियंत्याचे नाव आहे. काल साडेपाच हजारांची मागणी केली. तडजोडीअंती साडेचार हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर आज साडेचार हजार रुपये स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
यातील चोपडा तालुक्यातील तक्रारदार यांच्या घरी नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी सहायक अभियंता अमित सुलक्षणे (चोपडा शहर कक्ष 2) यांनी साडेपाच हजार रुपयांची मागणी केली आणि तडजोडअंती 4500 रुपये घेण्याचे ठरले होते. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि सहायक अभियंता अमित सुलक्षणे यांस साडेचार हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
त्यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पो. कॉ. प्रणेश ठाकूर, पो ना/मराठे, पो ना/राकेश दुसाने यांच्या पथकाने केली.
नागरिकांना महत्त्वाचे आवाहन –
तुमच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,जळगाव येथे संपर्क करावा, असे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच टोल फ्री क्रमांक 1064 क्रमांकावर तुम्ही तक्रार देऊ शकतात.