मुक्ताईनगर – जळगावमधील कुसुंबा येथील तलाठ्यास तीन हजार रुपयाची लाच घेताना अटक केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी 5 हजारांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तलाठ्यासह दोन खासगी पंटरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रशांत प्रल्हाद ढमाळे (वय 42, तलाठी, सजा काकोडा ता. मुक्ताईनगर) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तर अरुण शालीग्राम भोलानकार (वय 32) आणि संतोष उबरकर (वय 25, दोन्ही रा. कुऱ्हा ता. मुक्ताईनगर) दोन खासगी पंटरची नावे आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
तक्रारदार यांचे आजोबा यांचे मुक्ताईनगरमधील कुऱ्हा येथे शेत आहे. तक्रारदार यांच्या आजोबांचा 1997 मध्ये मृत्यू झाला आहे. तेव्हापासुन तक्रारदार यांचे वडील, काका, आत्या आणि मृत काकांच्या मुलांचे यांचे 7/12 उताऱ्यावर नाव लावणे बाकी होते. त्यासाठी तक्रारदार यांनी मागील 7 ते 8 दिवसापूर्वी कुऱ्हा गावातील तलाठी याची भेट घेतली असता यातील तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे यांनी तक्रारदार यांना तुम्हाला प्रत्येक वर्षाचे 220 रुपये या प्रमाणे 6000 रुपये शासकीय फी भरावी लागेल. तसेच जर तुम्हाला शासकीय फी भरायची नसेल तर मला 5000 रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते.
प्रशांत प्रल्हाद ढमाळे व अरुण शालीग्राम भोलानकार यांनी तक्रारदाराचे 7/12 उताऱ्यावर त्याचे वडील, काका, आत्या व मृत काकाच्या मुलाचे नाव लावण्याचे मोबदल्यात 5000/-लाचेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने 1 जानेवारी 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव याठिकाणी याबाबतची तक्रार दिली होती.
त्यानंतर आज 8 जानेवारी सापळा रचून लाचेची रक्कम अरुण शालीग्राम भोलानकार याच्या सांगण्यावरुन संतोष प्रकाश उबरकर या खासगी व्यक्तीला 5000 रुपयांची लाच स्वतः स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
याप्रकरणी त्यांच्यावर मुक्ताईनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. ही कारवाई लाप्रवि जळगांव पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, सापळा पथकातील GPSI दिनेशसिंग पाटील, पोकॉ प्रदिप पोळ, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे यांनी केली.
दरम्यान, नागरिकांकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ लाचलुचपत विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.