मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 10 सप्टेंबर : सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये कार्यरत चोपडा येथील जवान अरुण दिलीप बडगुजर (वय 42, रा. साई बाबा कॉलनी, चोपडा) हे सोमवारी 9 सप्टेंबर रोजी त्रिपुरा येथे चकमकीत लढताना शहीद झाले. अरूण बडगुजर हे गेल्या 20 वर्षांपासून 105 बीएसएफ बटालियन (सीटी /जीडी) मध्ये कार्यरत होते. ते चार महिन्यांनी निवृत्त होणार होते. मात्र, दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते शहीद झाल्याने मोठा धक्का बसला आहे.
दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण –
मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएफ जवान अरुण बडगुजर हे सोमवारी दुपारच्या सुमारास भारत-बांगलादेश सीमेवर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले. याबाबतची माहिती मिळताच काल सायंकाळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
शहीद जवानावर उद्या होणार अंत्यसंस्कार –
शहीद जवान अरुण बडगुजर यांचे पार्थिव आगरतळा येथून बंगळूरूमार्गे आज रात्री मध्यप्रदेशातील इंदूर येथे पोहोचणार आहे. यानंतर बीएसएफच्या वाहनाने उद्यापर्यंत (11 सप्टेंबर) जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे पोहचणार आहे. यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती 105 बीएसएफ बटालियनचे इन्स्पेक्टर (GD) महावीर प्रसाद यांनी सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना दिली.
हेही वाचा : Jalgaon Police : चिमुकल्याला वाचविण्यासाठी पोलीस तरूणीने नदीत घेतली उडी, जळगावात नेमकं काय घडलं?