जळगाव, 10 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गुढे गावातील जवानाला सीमेवर कर्तव्यावर असताना वीरमरण आलंय. स्वप्निल सुभाष सोनवणे (वय 39) असे त्या जवानाचे नाव आहे. 57 वाहिनी सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल पदावर पश्चिम बंगालमध्ये ते कार्यरत होते. जवान स्वप्निल सोनवणे यांचा सीमाप्रहरी कर्तव्य बजावत असताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 7.23 वाजता बीओपी ढोलागुरी येथे घडली. त्यांचे पार्थिव सैनिकी सन्मानाने मूळ गावी गुढे (ता. भडगाव, जि. जळगाव) रवाना करण्यात आले आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, जवान स्वप्निल सोनवणे हे सीमा फ्लड लाईट खांब क्रमांक 17 दुरुस्त करण्याचे काम करत असताना विजेचा धक्का बसून काँक्रिट बेसवर पडले. त्यांना तत्काळ बीएसएफ रुग्णवाहिकेतून सहकाऱ्यासह बाळुरघाट जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र सायं.8 वाजून 35 मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना दाखल केल्यावर मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर समोर येईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
मंगळवारी होणार अंत्यसंस्कार –
वीर जवान स्वप्निल सोनवणे यांचे पार्थिव हे पश्चिम बंगालमधून उद्या सांयकाळी 5 वाजेच्या सुमारास इंदौर विमानतळावर दाखल होईल. यानंतर त्यांच्या मूळ गावी भडगाव तालुक्यातील गुढे येथे त्यांचे पार्थिव आणले जाईल. यानंतर गुढे येथे सैनिकी सन्मानाने मंगळवार दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता वीर जवान स्वप्निल सोनवणे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
2014 साली बीएसएफमध्ये भरती –
वीर जवान स्वप्निल सोनवणे हे मूळचे भडगाव तालुक्यातील गुढे गावचे रहिवासी असून 2014 साली ते भारतीय सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. बीएसएफमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी पंजाब येथे प्रशिक्षण पुर्ण केले आणि आतापर्यंत त्यांनी गुजरात, राजस्थान, जम्मू-काश्मीर तसेच पश्चिम बंगाल याठिकाणी सेवा बजावली. दरम्यान, 11 वर्षांपासून देशसेवा करत असताना पश्चिम बंगालमध्ये कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले.
वीर जवान स्वप्निल सोनवणे यांच्या पश्चात आई, पत्नी तसेच एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. पाच वर्षांपुर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. दरम्यान, आता वीर जवान स्वप्निल परिवारातून गेल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.