नागपूर – विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामध्ये अखेर 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. याच वेळी मंत्रीमंडळ विस्तार होणार की नाही, याबाबतही चर्चा सुरू होती. मात्र, 5 डिसेंबर रोजी फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा सोहळा पार पडला. यानंतर मात्र, खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, मंत्र्यांचा शपथविधी कधणी होणार, याची सर्वत्र चर्चा होत होत होती. यातच आता सर्व प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे.
नागपूर येथे उद्यापासून हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होत असून 16 ते 21 डिसेंबर दरम्यान, हे अधिवेशन होणार आहे. दरम्यान, या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज नागपुरातील राजभवनात मंत्रिमंडळ विस्तार होणार असून मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आजचा हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक मानला जात आहे. कारण तब्बल 33 वर्षांनी नागपुरात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. त्यामुळे हा इतिहासातील दुसराच प्रसंग आहे.
33 वर्षांपूर्वी नागपुरात झाला होता मंत्रिमंडळाचा विस्तार –
33 वर्षांपूर्वी म्हणजे डिसेंबर 1991 मध्ये नागपूर येथे शिवसेनेच्या पहिल्या फुटीनंतर बंडखोर आमदारांपैकी छगन भुजबळ आणि डॉ. राजेंद्र गोडे यांच्यासोबत काँग्रेसच्या 5 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि बुलढाण्याचे डॉ. राजेंद्र गोडे यांच्यासोबत अमरावतीच्या वसुधाताई देखमुख, आमगावचे भरत बाहेकर, ठाण्याचे शंकर नम, बीडचे जयदत्त क्षीरसागर आणि धुळ्याच्या शालिनी बोरसे या 6 उपमंत्र्यांनी शपथ घेतली होती. 21 डिसेंबर 1991 रोजी नागपुर येथे हा शपथविधी सोहळा झाला होता. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी सुधाकरराव नाईक हे विराजमान होते.
पहिल्यांदा शिवसेनेत फुट –
1991 मध्ये शिवसेनेत पहिल्यांदा फूट पडली होती. हिवाळी अधिवेशनाच्या वेळी 5 डिसेंबर 1991 रोजी शिवसेनेत फूट पडली होती. 12 आमदारांसह छगन भुजबळ हे शिवसेनेतून बाहेर पडले होते. त्यानंतर नागपुर येथे झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ आणि डॉ. राजेंद्र गोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी छगन भुजबळ यांना महसूल तर उपमंत्री डॉ. राजेंद्र गोडे यांना गृहखाते मिळाले होते.
पक्षफुटीवर मधुकरराव चौधरींनी दिला होता ऐतिहासिक निर्णय –
1991 मध्ये शिवसेनेत झालेल्या पक्षफुटीवेळी विधासभेचे अध्यक्ष हे खान्देशातील जळगाव जिल्ह्याच्या फैजपूर येथील मधुकरराव चौधरी होते. शिवसेनेतील पक्षफुटीवर त्यांनी ऐतिहासिक निकाल दिला होता. यावेळी त्यांनी म्हटले होते की, 12 आमदारांची संख्या हीसुद्धा एक तृतीयांशपेक्षा अधिक असल्याने कोणीही अपात्र ठरत नाही. त्यांनी दिलेल्या या निकालानंतर शिवसेनेचे संतप्त, आक्रमक आमदार त्यांच्या आसनापर्यंत पोहोचले होते. मात्र, तुम्ही मला मारा, पण मी माझा निर्णय बदलणार नाही, असे स्पष्ट उत्तर मधुकरराव चौधरी यांनी दिले होते. यानंतर त्यांचा हा निर्णय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही उचलून धरला होता.
बाप तो बापच!, स्वत:ची किडनी देऊन वाचवला आपल्या मुलीचा जीव, जळगाव जिल्ह्यातील घटना