मुंबई, 13 मे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४’चा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ह्या परिक्षेला अडीच महिने उलटून गेल्याने निकालाची अधिकृत घोषणा झालेली नाहीये. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
नेमकी बातमी काय? –
एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षेअंतर्गत सहायक कक्ष अधिकारी (54 पदे), राज्य कर निरीक्षक (209 पदे) आणि पोलिस उपनिरीक्षक (216 पदे) अशा एकूण 479 पदांसाठी ही भरतीप्रक्रिया राबवली जात असून मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती.
या वर्षाच्या सुरूवातीला 5 जानेवारी 2025 रोजी होण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, काही कारणास्तव ती पुढे ढकलून 2 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आली. दरम्यान, परीक्षेनंतर तीन दिवसांनी 5 फेब्रुवारीला पहिली उत्तरतालिका, तर 4 मार्चला दुसरी उत्तरतालिका जाहीर करण्यात आली.
गट ब चा निकाल रखडला –
दरम्यान, उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर एका महिन्याच्या आत निकाल लागणे अपेक्षित असते. एकीकडे गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल रखडला असतानाच गट क ची परीक्षा येत्या 1 जून रोजी होत आहे. गट क ची परीक्षा जवळ आली असताना गट ब चा निकाल रखडल्याने विद्यार्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.