बार्बाडोस, 30 जून : भारतीय क्रिकेटने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात द. आफ्रिकेला हरवत तब्बल 17 वर्षांनतर टी-20 विश्वचषकावर नाव कोरलंय. बार्बाडोस येथे रंगलेल्या या अंतिम सामन्यात भारताने द. आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. दरम्यान, या सामन्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
विराट कोहलीनंतर कॅप्टन रोहित शर्मा टी-20 मधून निवृत्त –
टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने सामनावीरचा किताब मिळवला. सामन्यानंतर त्याने आपण टी-20 क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. क्रिकेट चाहते या धक्क्यातून सावरत नाही तोपर्यंत रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेत त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, विराट कोहलीनंतर कॅप्टन रोहित शर्मानेही आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय.
भारताचा ऐतिहासिक विजय –
भारतीय क्रिकेट संघाने द. आफ्रिकेचा रोमहर्षकपणे पराभव केला. संपुर्ण क्रिकेट जगाताच्या लक्ष लागलेल्या भारत विरूद्ध द. आफ्रिकेच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत ऐतिहासिक विजय मिळवला. टीम इंडियाने तब्बल 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यात भारताला यश आले. या ऐतिहासिक कामगिरी नंतर स्टार फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.